नागपूर : अथर्वनगरीमध्ये १० वर्षांच्या बालिकेला नरकयातना देऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या प्रकरणाने समाजमन हादरले होते. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही प्रमुख आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी यातील एका आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देत बोलण्यासाठी मोबाईल फोन व जेवणासाठी हॉटेलमधील जेवण पुरविल्याच्या चर्चांना उधाण आले आहे, तर पोलिसांनी मात्र दुसऱ्या आरोपीला बंगळुरूतून नागपुरात बोलाविण्यासाठी जाणुनबुजून हा ‘ड्रामा’ केला व आरोपीलाच त्याच्याशी संपर्क करायला लावला, असा दावा केला आहे. या ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’बाबत नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याने पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांबाबत विविध प्रश्न उपस्थित होत होते.
अथर्वनगरीत अरमान खान याच्या घरात २०२० सालापासून नरकमय जीवन जगणाऱ्या मुलीचे प्रकरण २९ ऑगस्ट रोजी समोर आले. अरमानची पत्नी हिना व मेहुणा अजहर हेदेखील तिला मारहाण करायचे व अजहर-अरमानने तिच्यावर लैंगिक अत्याचारदेखील केले. पोलिसांनी या प्रकरणात ३१ ऑगस्ट रोजी अरमानला अटक केली. त्याला १० दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली, तर अरमानचा मेहुणा अजहर यालाही सोमवारी अटक करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांमध्ये आरोपी अरमानला पोलिसांनी व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आहे. चौकशीच्या नावाखाली अरमानला दिवसभर अधिकाऱ्याच्या खोलीत बसवले जाते. पोलिसांनी त्याला बोलण्यासाठी मोबाईल फोन पुरविला. एका खोलीत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच तो मोबाईलवर बोलत होता. काही लोक कारने त्याला भेटायला आले व त्यांनीच त्याला बाहेरून हॉटेलचे जेवण आणून दिले, असे दावे करण्यात येत आहेत. व्हीआयपी सुविधेचे सत्य उघडकीस येण्याच्या भीतीने पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांच्या दालनात जाण्यापासून रोखले जाते, अशा चर्चा रंगल्या होत्या.
पोलिसांचा दावा, जाळ्यात अडकविण्यासाठी दिला फोन
याबाबत हुडकेश्वरचे ठाणेदार जग्वेंद्रसिंह राजपूत यांना विचारणा केली असता, त्यांनी ते सुटीवर असल्याचे स्पष्ट केले; मात्र पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी जाणुनबुजून आरोपी अरमानला फोनवर बोलू दिले. यामागे अजहरला ताब्यात घेण्याचीच भूमिका होती, असे त्यांनी सांगितले. अझहरने पोलिसांचे फोन उचलले नाही. त्यामुळे पोलिसांनी अरमानला विश्वासात घेतले व त्याला फोनवर बोलू दिले. त्यानंतर नागपूरला महत्त्वाचे काम आले आहे, असा मॅसेज अरमानला द्यायला सांगितला. अजहरने तसे फोनवर सांगितल्याने अरमान नागपुरात आला. पोलिसांकडून त्याच्या लोकेशनचे ट्रॅकिंग करण्यात येत होतेच. त्यातूनच सोमवारी त्याला न्यायालयाजवळून अटक करण्यात आली, असा दावा त्यांनी केला.
आरोपीला खरोखर मिळाले हॉटेलमधील जेवण
अरमानला नियमितपणे हॉटेलमधील जेवण मिळत असल्याच्या चर्चा आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनीदेखील त्याला एकदा हॉटेलमधून जेवण देण्यात आल्याची कबुली दिली आहे. ज्या दिवशी आरोपी अजहरला अटक झाली तेव्हा त्याला हॉटेलमधील जेवण देण्यात आले. अरमानला रात्री उशिरा पकडण्यात आले. पोलिस ठाण्यात जेवण पुरविणाऱ्याची वेळ संपली होती व त्यामुळे नाइलाजाने त्याच्यासाठी जवळच्या हॉटेलमधून जेवण बोलवावे लागले होते.
हिना अद्यापही आउट ऑफ रिच
१० वर्षीय मुलीच्या मनात सर्वांत जास्त दहशत हिनाबाबत आहे. हिना बंगळुरूतच असल्याने पोलिसांनी तेथे पथक पाठविले होते. मात्र, तिच्या पत्त्यावर ती आढळली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती मुलीच्या आजारावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात गेली असल्याची शक्यता आहे.