रामटेक (नागपूर) : गावालगतच्या शेतात असलेल्या १० वर्षीय बालिकेवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढविला. या मोकाट कुत्र्यांनी तिच्या शरीराच्या विविध भागांचे अक्षरश: लचके तोडल्याने ती गंभीर जखमी झाली.
ही घटना मसला (काचूरवाही) येथे शनिवारी (दि. २६) दुपारी घडली. हंसिका सुनील गजभिये (१०, रा. मसला-काचूरवाही, ता. रामटेक) असे जखमी बालिकेचे नाव आहे. हंसिका ही मसला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकते. ती शनिवारी सायकलने गावाजवळील तिच्या शेतात गेली होती.
शेतात फिरत असताना पाच कुत्र्यांच्या कळपाने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. या कुत्र्यांनी लचके तोडल्याने तिचे डोके, चेहरा, हात-पाय, पोट मांडीला गंभीर जखमा झाल्या. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येताच नागरिकांनी धाव घेत कुत्र्यांना पिटाळून लावले.
कुत्र्यांचा बंदोबस्त करणार कोण?
हंसिका ही तिच्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होय. गावाकडील मोकाट कुत्रे आक्रमक व्हायला लागले आहेत. या कुत्र्यांनी कारण नसताना हंसिकावर हल्ला चढविला. ही कळपाने फिरणारी कुत्री पुढे अन्य मुलांवर अथवा नागिराकांवर तसेच गुरांवर हल्ला चढवून त्यांना जखमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कुत्री जीवघेणी ठरत असल्याने त्यांचा स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.