नागपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत लहान मुलांमध्ये लागण होण्याचे प्रमाण कमी होते. परंतु दुसऱ्या लाटेत ते वाढताना दिसून येत आहे. आता तिसऱ्या लाटेचा अंदाज वर्तविला जात आहे. कोरोना विषाणूचे ‘म्युटेशन’ लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. महाराष्ट्राच्या कोरोना टास्क फोर्सनेही सरकारला लहान मुलांना कोविडचा धोका असल्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर मेडिकल व मेयो प्रशासनाने लहान मुलांसाठी ‘पीआयसीयू’ व ‘एचडीयू’ मिळून ५०-५० असे एकूण १०० बेडचे ‘आयसीयू’ तयार करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठविला आहे. याला तातडीने मंजुरी मिळणे गरजेचे आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुले व कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते. परंतु दुसऱ्या लाटेत १९ वर्षांपर्यंतच्या वयोगटात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील चार महिन्यात ३०,४२० मुले बाधित झाली आहेत. यातच कोरोना विषाणूचे होत असलले ‘म्युटेशन’, लसीकरणापासून दूर असलेली मुले व कोरोना प्रतिबंधक नियमाचे मुलांकडून योग्य पद्धतीने पालन होत नसल्याने कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या कोरोना टास्क फोर्सनेही सरकारला लहान मुलांना कोविडचा धोका असल्याची सूचना केल्या आहेत. दोन आठवड्यापूर्वी नागपुरातही बालरोग तज्ज्ञांचे टास्क फोर्स तयार करण्यात आले. मेयो, मेडिकलने स्वत:कडून लहान मुलांसाठी ५०-५० बेडचे ‘आयसीयू’ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
- मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये लहान मुलांचे ‘आयसीयू’
मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये ५० खाटांचे ‘आयसीयू’ प्रस्तावित आहे. यात २५ बेडचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू), १५ बेडचे ‘हाय-डिपेन्डन्सी युनिट’ (एचडीयू) तर १० बेडचे ‘इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (एनआयसीयू) असणार आहे. यासोबतच लहान मुलांना लागणारे २० व्हेंटिलेटर व इतर आवश्यक यंत्रसामग्री व मनुष्यबळ मागितले आहे. सध्या मेडिकलमध्ये ८ खाटांचे ‘पीआयसीयू’ तर ३० खाटांचे ‘इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (एनआयसीयू) आहे.
- मेयोच्या ‘सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये होणार लहान मुलांवर उपचार
मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये कोरोनाच्या लहान मुलांसाठी ५० बेडचे ‘आयसीयू’ तयार केले जाणार आहे. यात १५ ‘पीआयसीयू’ तर ३५ ‘एचडीयू’ बेडचा समावेश आहे. यासोबतच व्हेंटिलेटर, पेडियाट्रिक नर्सिंग स्टाफ, डॉक्टर, वरिष्ठ निवासी डॉक्टर, इन्टर्न, वॉर्डबॉय, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव तयार करून शासनाला दिल्याची माहिती विभागाचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर बोकडे यांनी दिली.
- नॉन कोविड लहान मुलांवर उपचार सुरू असणार
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मेडिकलने कोरोनाचा लहान मुलांसाठी ५० आयसीयू बेडचा प्रस्ताव व त्याला लागणारी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठविला आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेष म्हणजे, रुग्णासोबत त्याची आई किंवा वडील राहणार असल्याने पलंगाचा साईज आम्ही मोठा ठेवला आहे. कोरोनाचा काळात नॉन कोविड लहान मुलांवरील उपचार सुरू राहतील.
डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल