पावसामुळे भाजीपाला महाग : स्थानिकांकडून आवक कमी नागपूर : देशाच्या सर्वच भागात पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी मुबलक प्रमाणात येणाऱ्या भाज्यांची आवक आता कमी आहे. त्यामुळे भाव दुपटीवर गेले आहेत. नागपूर जिल्हा, मध्य प्रदेशचे काही जिल्हे आणि सीमेलगतच्या काही गावातून उत्पादकांना भाज्या आणताना अडचणी निर्माण झाल्या असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्यामुळे ठोक आणि किरकोळ बाजारात भाज्या महागच आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आवक वाढेल, परिणामी भाव कमी होतील, अशी माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी भाज्यांची लागवड केली आहे. भाजीपाला मुबलक प्रमाणात बाजारात येण्यास दीड महिन्यांचा कालवधी लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना भाज्या पुढील दीड महिने जास्त भावातच खरेदी कराव्या लागतील. स्थानिक उत्पादकांकडून आवक कमी झाल्यामुळे भाज्यांच्या किमतीवर परिणाम झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांकडून फुलकोबी, पालक, चवळी भाजी आणि वांगे विक्रीस येत आहेत. किरकोळमध्ये फुलकोबी आणि सिमला मिरचीचे भाव १०० रुपये किलो होते. तर टमाटर ५० रुपये किलो या भावाने विक्री झाली. वांगे ३५ ते ४० रुपयांवर स्थिर होते.
फुलकोबी शंभरीत !
By admin | Published: July 13, 2016 3:28 AM