नागपूर : मावळत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी लहानमोठे हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसोर्ट, क्लब, बँक्वेट हॉल, पब, आदींमध्ये होणाऱ्या पार्ट्या आणि अन्य कार्यक्रमांवर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी निर्बंध घातल्यामुळे, कुठल्याही प्रकारचे आयोजन होणार नसल्याने नागपूर जिल्ह्यात आज, ३१ डिसेंबरला एकाच दिवशी १०० कोटींचे नुकसान होणार असल्याची माहिती आहे. रोज नवीन नियमावलीचे परिपत्रक निघत असल्यामुळे यंदा कुणाचीही पार्ट्या आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्याची मानसिकता नाही. त्यामुळे आयोजनावर अवलंबून असलेल्या जवळपास ८० व्यावसायिकांचे नुकसान होणार आहे. शिवाय नागपूर जिल्ह्यात शासनाचा जवळपास २० कोटींचा महसूल बुडणार आहे.
लगतच्या राज्यांमध्ये निर्बंध नाही
मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांमध्ये कुठलीही बंधने नसल्यामुळे येथील पर्यटक मोठ्या संख्येने नवीन वर्ष साजरे करण्यासाठी आधीच या राज्यांमध्ये गेले आहेत. नागपुरात लहानमोठी तीन हजारांपेक्षा जास्त हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब, रिसोर्ट, बेकरी आहेत. या सर्वांमध्ये नववर्षाला पॅकेजची व्यवस्था असते. नववर्ष साजरे करण्यासाठी अनेकजण हॉटेल्स व रिसोर्टमध्ये पार्ट्यांना कुटुंबीयांसह हजेरी लावून खोल्या बुक करतात; पण यंदा पार्ट्यांचे आयोजन नसल्यामुळे हॉटेल्सच्या खोल्या रिकाम्याच आहेत. कठोर निर्बंधांमुळे लोकही हॉटेल्स, ढाबा, रिसोर्टकडे फिरकणार नाहीत. या सर्व गोष्टींचा फटका व्यावसायिकांना बसणार आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये आयोजनाची जबाबदारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडे असते. निर्बंधामुळे त्यांच्याही व्यवसायावर संक्रांत आली आहे. ३१ डिसेंबरला अनेक रेस्टॉरंटमध्ये गर्दी असते. ग्राहकांना सेवा देण्यासाठी रेस्टॉरंटबाहेरील खुल्या जागेत टेबल टाकले जातात; पण ५० टक्के क्षमतेचे बंधन असल्यामुळे रेस्टॉरंट व हॉटेल्स रिकामे राहणार आहे. निर्बंधामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंटवर रोषणाई वा संगीत कार्यक्रमही होणार नाहीत. त्यामुळे सजावट करणाऱ्यांना नुकसान सोसावे लागेल. कोरोना निर्बंधांमुळे सर्व प्रकारच्या नुकसानीचा आकडा १०० कोटींवर जाण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली.
नियमांचे पालन करू
यंदा हॉटेलमध्ये कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन केलेले नाही. पार्टीच्या निमित्ताने खोल्याही बुक झालेल्या नाहीत. या वर्षीचे आयोजन साध्या पद्धतीने राहील. नियमांचे पालन करून नववर्षाचे स्वागत करू.
सुजित सिंग, महाव्यवस्थापक, हॉटेल रेडिसन्स ब्लू.
गर्दी होईल अशा कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये, अशा सूचना असोसिएशनच्या सदस्यांना दिल्या आहेत. या वर्षी नववर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने करण्यात येईल. त्यामुळे आर्थिक नुकसान होणार आहे.
तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सिअल हॉटेल्स असोसिएशन.
या वर्षी कुठल्या इव्हेंटचे आयोजन केलेले नाही. नेहमीप्रमाणे शासनाच्या नियमांचे पालन करून ग्राहकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नववर्ष साजरे करू; पण कुठलाही झगमगाट राहणार नाही. ग्राहकांसाठी हॉटेल खुले राहील.
- मिकी अरोरा, एमडी, हॉटेल सेंटर पॉइंट.
वेळेचे आणि ५० टक्के क्षमतेचे निर्बंध असल्यामुळे कुठलाही नवीन मेन्यू राहणार नाही. निर्बंधांतर्गत वेळेच्या आत हॉटेल बंद करावे लागणार आहे. निर्बंधामुळे ग्राहक घराबाहेर निघतील वा नाही, ही शंकाच आहे.
- भवानीशंकर दवे, अध्यक्ष, नागपूर हॉटेल्स ओनर्स असोसिएशन.