मोरेश्वर मानापुरेनागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे शाळा व कॉलेज बंद आहेत. संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियाचा ठप्प झाल्याने पालकांनी स्टेशनरी वस्तूंची खरेदी थांबविली आहे. त्यानंतर सुरू झालेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांनीही या साहित्यांकडे पाठ फिरविली आहे. या घटनाक्रमामुळे संपूर्ण विदर्भाची बाजारपेठ असलेल्या नागपुरात स्टेशनरी साहित्यांचा जवळपास १०० कोटींचा व्यवसाय ठप्प झाल्याची माहिती उत्पादक आणि विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.विदर्भ पेन आणि स्टेशनर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनदास आहुजा म्हणाले, स्टेशनरी वस्तूंमध्ये पेन, नोटबुक, रजिस्टर, इंजिनिअरिंग शीट, व साहित्य, प्लास्टिक, कागदी, कापडी आणि विविध प्रकारच्या फाईल, कॉम्पस, पॅड, जॉमिट्री बॉक्स, गोंद आदींसह २०० पेक्षा जास्त साहित्यांची विक्री होते. नागपुरात असोसिएशनचे २०० सदस्य आणि लहानमोठे एकूण ५०० पेक्षा जास्त स्टेशनरी वस्तूंचे विक्रेते आहे. याशिवाय ३० पेक्षा जास्त व्यापारी नोटबुक व रजिस्टरचे उत्पादन करतात. विद्यार्थ्यांकडून मागणीच नसल्याने विदर्भातील किरकोळ दुकानदारांनी नागपुरातील ठोक व्यापाऱ्यांकडून स्टेशनरी बोलविणे थांबविले आहे. त्यामुळे उलाढालीची संपूर्ण साखळी थांबली आहे. यंदा या वस्तूंच्या विक्रीची काहीही शक्यता नसल्याचे आहुजा यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थी व पालकांकडून साहित्यांची खरेदी थांबलीनवीन शैक्षणिक सत्र आणि परीक्षांसाठी ठोक विक्रेते फेब्रुवारीपासून तयारी करतात. याशिवाय याच महिन्यात नोटबुक आणि रजिस्टरचे उत्पादन सुरू होते. यावर्षी तयार नोटबुक आणि रजिस्टर किरकोळ विक्रेत्यांनी बोलविले नाही. त्यामुळे उत्पादकांकडे कोट्यवधींचा साठा पडून आहे. विक्रीसाठी धडपड सुरू आहे. दुसरे म्हणजे सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कमी हजेरीमुळे स्टेशनरीचा उपयोग कमी झाला आहे. शिवाय परीक्षा न झाल्याने पेपर व अन्य साहित्य उपयोगात आले नाहीत. त्याचाही परिणाम या व्यवसायावर पडला आहे.निर्मिती करणारे परिवार उघड्यावरनोटबुक व रजिस्टरचे उत्पादक संजय खुळे म्हणाले, नागपुरातून संपूर्ण विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेशात नोटबुक, रजिस्टर आणि अन्य साहित्यांची विक्री होते. नागपुरात नोटबुक व रजिस्टर निर्मितीचा जवळपास ३० कोटींचा व्यवसाय असून याची निर्मिती मध्य नागपुरात कंत्राटीवर घरोघरी करण्यात येते. हा सिझन फेब्रुवारीपासून सुरू होऊन जूनपर्यंत चालतो. या व्यवसायात जवळपास २०० ते २५० कुटुंब गुंतले आहे. त्यांच्या हाताला काम नसल्याने जवळपास २००० पेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन त्यांनी घरी मशीन बसविल्या आहेत. पण आता हाताला कामच नसल्याने कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. पूर्वी उत्पादकांनी त्यांना मदत केली, पण मदतीअभावी आता त्यांना जगणे कठीण झाले आहे.असोसिएशनच्या मागण्या :- व्यवसाय कर व सहा महिन्यांचा जीएसटी माफ करावा.- वीज बिलात सूट द्यावी.- बँकांनी कर्जावर व्याज आकारू नये.- शासनाने व्यावसायिकांना आर्थिक पॅकेज द्यावे.