लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिसेंबरमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज आयसीएमआरने दर्शवला आहे. त्या अनुषंगाने नागपूर प्रशासन तयारीला लागले आहे. राज्य सरकारने जम्बो हॉस्पिटल बनविण्यासाठी निधी गोळा करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु, जम्बो ऐवजी मेयो, मेडिकल, एम्सला सक्षम बनविण्यावर एकमत झाले आहे. यासाठी १०० कोटी रुपये निधीची गरज असल्याचे नागपूर सुधार प्रन्यासच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले असून, यासाठी नासुप्र १२.५ टक्के, एनएमआरडीए १२.५ टक्के, महाराष्ट्र सरकार २५ टक्के, जिल्हाधिकारी २५ टक्के आणि मनपा २५ टक्के निधी देतील.
बैठकीनंतर स्थायी समिती अध्यक्ष व नासुप्र विश्वस्त विजय झलके व भूषण शिंगणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मानकापूर स्टेडियममध्ये जम्बो हॉस्पिटलचा प्रस्ताव आहे आणि नंतर तो सेटअप काढावा लागणार आहे. त्याऐवजी मेयो, मेडिकल व एम्सवर १०० कोटी रुपये खर्च केल्यास कोरोनानंतरही संबंधित सेटअपचा उपयोग करता येणार आहे. परंतु, यावरील निर्णय विभागीय आयुक्तांना घ्यायचा असून, त्यांच्या निर्णयानंतरच पुढचे पाऊल टाकले जाणार असल्याचे झलके व शिंगणे यांनी यावेळी सांगितले.
४ सिवरेज ट्रीटमेंट प्लांट जयताळा रोडवर तयार आहे. संबंधित प्लांटमध्ये ३७ एमएलडी पाण्यावर ट्रीटमेंट करण्यात येत आहे. ते मनपाकडे सुपूर्द केले जाईल.
मेयोला हवी नासुप्रची ११.१२ एकर जमीन
मौजा वांजरीमध्ये नासुप्रच्या मालकीची ११.१२ एकर जमीन आहे. इंदिरा गांधी शासकीय चिकित्सा महाविद्यालय व हॉस्पिटल (मेयो)ने पद्व्युत्तर अभ्यासक्रम व ९०० बेडचे हॉस्पिटल बनविण्यासाठी या जमिनीची मागणी केली होती. या संदर्भातील प्रस्ताव नासुप्र बोर्डाच्या बैठकीत सादर करण्यात आला. तांत्रिक बाबींचा विचार केल्यानंतर आणि कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर यावर निर्णय घेण्याचा सल्ला विश्वस्तांनी दिला आहे. संबंधित जमिनीवर मेयोच्या मार्गदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल व अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
स्वस्त घरकुलांसाठी पुन्हा निघणार ड्राॅ
नासुप्रकडून ४,४७५ स्वस्त घरकुलांचे निर्माण कार्य पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. यातील ७० ते ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी ड्राॅ काढण्यात आला होता. त्यात १२०० घरकुलांची बुकिंग झाली आहे. नागरिकांना कर्ज उपलब्ध करवून देण्यासाठी नासुप्रकडून पुढाकार घेतला जात आहे. यासोबतच नंदनवनमध्ये प्रीफॅब्रिकेटेड १६ घरे तयार आहेत. त्याचे वाटप लवकरात लवकर करण्याची मागणी ट्रस्टींनी केली असल्याचे झलके यांनी सांगितले.