नागपूर : नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहचला आहे. लोकांच्या घराघरापर्यंत कार्यकर्ते पोहचत आहे. उमेदवाराने केलेले कार्य व घोषणांची माहिती पोहचविण्यासाठी प्रचाररथाची मदत घेतली जात आहे. यासाठी नागपुरातून १०० तर रामटेकमधून २१ वाहनांना आरटीओकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातून २६ तर रामटेक लोकसभा मतदार संघातून २८ उमेदवार उभे आहेत. निवडणुकीच्या प्रचारासाठी वाहनांवर उमेदवाराच्या फोटोसह त्यांच्या चिन्हांचे फलक लावलेली वाहने वस्त्यावस्त्यांमधून व चौका-चौकांतून फिरत आहे. विशेष म्हणजे, प्रचाराचे प्रभावी तंत्र मानले जाणारे प्रचाररथ तयार करताना वाहनांच्या अंतर्गत रचनेत कोणताही बदल करण्याची परवानगी नाही.वाहनांच्या बाह्य स्वरूपात मात्र बदल करता येतो. अनेक उमेदवार आपल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे आकार वाहनांना देतात, तर काही जण वाहनांवर केवळ फलक, पोस्टर लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ‘प्रचाररथ’ किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगानंतर मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाची बाह्य रचनेतील बदल, चालकाच्या दृष्टीक्षेपात बाधा तर नाही ना अशा घटकांची तपासणी करून आरटीओकडून ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले जाते. आतापर्यंत नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातून नागपूरसाठी १०० तर नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयातून रामटेकसाठी २१ वाहनांना ‘एनओसी’ देण्यात आली आहे. प्रचाराला आणखी ९ दिवस असल्याने खासगी व व्यवसायीक वाहनांना ‘एनओसी’ देणे सुरू आहे. -चारचाकी वाहनांसाठी २ हजार रुपये शुल्कचारचाकी वाहनातून प्रचार करण्यासाठी आरटीओला २ हजार रुपये तर तिन चाकी वाहनातून प्रचार करण्यासाठी ५०० रुपये आकारले जात आहे. वाहनातून प्रचार करण्याची मुदत १७ एप्रिलपर्यंत आहे. ‘एनओसी’ देण्यासाठी दोन्ही आरटीओ कार्यालयात स्वतंत्र खिडकी तयार करण्यात आली आहे. - असे आहेत नियम प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार जाहिरातीचा आकार ठरविण्यात आला आहे. वाहनांच्या दर्शनी भागावर जाहिराती लावण्यास बंदी आहे. जाहिरात वाहनाच्या लांबी, रुंदीपेक्षा जास्त नसावी. जाहिरातीमुळे वाहनाचे हेडलाईट, टेललाईट, इंडिकेटर, रिअर व्हु मीरर, नंबर प्लेट आदी आच्छादीत होणार नाही, पक्षाचा झेंडा वाहन चालकाच्या दृष्टीसमोर नसावा. चकाकणाºया, प्रकाशमान जाहिरातींवर निर्बंध असून ३.८ मीटर उंचीपर्यंतच जाहिरात लावण्याला मंजुरी आहे.
नागपुरात १०० तर रामटेकमध्ये २१ प्रचाररथ; आरटीओने दिली एनओसी
By सुमेध वाघमार | Published: April 08, 2024 7:02 PM