चेल्याची ‘गुरू’वर मात : साथीदारांचाही डब्बा गोल नरेश डोंगरे नागपूरडब्ब्याच्या सट्टेबाजीचे डावपेच लक्षात आल्यानंतर नागपुरातील सराईत सट्टेबाजांनी (खेळाडूंनी) देशभरातील अनेकांना शेकडो कोटींचा गंडा घातला. डब्ब्यात गुंतलेल्या व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांना, छोट्या-मोठ्या सट्टेबाजांनी सट्टेबाजांना चुना लावला. त्याच्या पुढे पाऊल टाकत काही सराईत सट्टेबाजांनी आपल्या ‘गुरू’लाही कोट्यवधींचा चुना लावल्याची खळबळजनक माहिती उजेडात आली आहे. बेईमानीचा खेळ इमानदारीने खेळला जातो, अशी एक म्हण प्रचलित आहे. मात्र, डब्बा सट्टेबाजीच्या खेळात १०० टक्के बेईमानीच चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डब्ब्याच्या जुगारात गुरूला चेल्याने मात दिल्याचे उदहारण वीणा घनश्यामदास सारडाच्या रूपाने पुढे आले आहे. सारडा हिने केवळ दलाल आणि शासनच नव्हे तर या खेळाचा गुरुमंत्र देणाऱ्या आपल्या गुरूलाही गंडविले आहे. प्रतिबंध असताना स्वत:च्या कंपनीच्या शेअर्सची खरेदी-विक्री करून ती ग्राहक, व्यापारी, दलाल अन् शासनाचीही दिशाभूल करीत होती. कुशल किशोर लद्दड हा नागपुरातील एक प्रमुख डब्बेबाज (दलाल) आहे. त्याने अनेक उद्योजक, व्यापारी तसेच धनिक पुत्रांना डब्ब्याच्या सट्टेबाजीत उतरविल्याचे बोलले जाते. त्यानेच वीणा सारडा हिलाही डब्ब्यातील नोटा दाखविल्या. लगवाडी करताना बनवाबनवीचा खेळ लक्षात आल्यानंतर वीणा सारडा हिने या धंद्यातील तिचा गुरू कुशल लद्दड यालाच टोपी घातली. कुशलच्या माध्यमातून आठ महिन्यात तब्बल २५०० कोटी रुपयांची सट्टेबाजी करणाऱ्या वीणा सारडावर कुशलचे पावणेसात कोटी रुपये थकले. ते देण्यासाठी ती टाळाटाळ करू लागली. सारडा परिवाराची प्रतिष्ठा आणि आर्थिक संपन्नता बघून कुशलने गोडीगुलाबीनेच ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने आपले पावणेसात कोटी मिळण्यासाठी सारडाच्या निकटवर्तीयांसह प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही प्रयत्न केले, मात्र सारडाने कुशलला दाद दिली नाही. उलट पोलिसांशी जवळीक असलेल्या एका ‘दलाला’ला हाताशी धरून अंबाझरी ठाण्यात कुशल आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करून घेतला. दुहेरी वार, अपमान आणि बदनामी झालेल्या कुशलने पोलिसांच्या कचाट्यातून स्वत:ची आणि कार्यालयीन सहकाऱ्यांची कशीबशी सुटका (जामिनावर) करून घेतली होती. मात्र, पावणेसात कोटीसारखी मोठी रोकड थकल्याने कुशलच्या धंद्याचा डब्बा गोल झाला. परिणामी संतापलेल्या कुशलने डब्बाच फोडण्याचे प्रयत्न सुरू केले. ८ डिसेंबर २०१५ ला अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस सारडाविरुद्ध कारवाई करायला तयार नसल्याचे लक्षात आल्याने, कुशलने काही पत्रकारांकडेही चकरा मारल्या. डब्ब्याचे गौडबंगाल अंधारात ठेवून त्याने स्टॉक एक्स्चेंजचे नाव पुढे केले आणि आपल्या फसवणूक तसेच अन्यायाचा पाढा वाचला. मात्र ‘आपसी भानगड’ असल्याचे लक्षात आल्याने पत्रकारांकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याने गुन्हे शाखेत सारडाविरुद्ध तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पाच महिन्यांनी पोलिसांनी डब्बा फोडून गुन्हे दाखल केले. सट्टेबाजांचा ‘स्पॉट एक्स्चेंज’कुशलला ‘चेला मंत्र’ देणाऱ्या सारडाने आपल्या (सारडा एनर्जी अॅन्ड मिनरल्स) कंपनीच्या रोखे खरेदी-विक्रीची बेकायदेशीर प्रक्रिया डब्बा बाजारात मांडून कोट्यवधींचा गेम खेळला. सारडासारखीच गेमबाजी अनेक सराईत डब्बा व्यापाऱ्यांनी केली. त्यांनी डब्बा व्यापाराला ‘स्पॉट एक्स्चेंज’ असे नाव दिले. कथित कंपन्यांच्या कथित चीजवस्तूंची फोनवरून आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून खरेदी-विक्री करीत त्यांनी देशभरातील हजारो सट्टेबाजांची शेकडो कोटींनी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे, डब्बा फुटल्यानंतरही फसवणूक झालेले तक्रार नोंदविण्यासाठी पुढे आलेले नाही. अग्रवाल मेसेजया प्रकरणातील फरार आरोपी रवी अग्रवाल याने आपल्या साथीदारांच्या माध्यमातून ‘देश के नाम संदेश’च्या थाटात शनिवारी एक मेसेज पाठविला आहे. व्हॉटस्अॅपवरून तो व्हायरल करण्यात आला. बहुतांश पोलीस अधिकाऱ्यांना हा मेसेज मिळाला. त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने लोकमतशी खासगीत बोलताना रवीला ब्रेन अॅनालिसिस आणि नार्कोचे आव्हान दिले आहे. दुसरीकडे अग्रवालच्या संपर्कातील दोन डझन ‘प्रमुखां’ची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून अग्रवालला शोधण्याचे पोलीस प्रयत्न करीत आहेत. कुठे आहेत शेकडो कोटी? दरदिवशी शेकडो कोटींची सट्टेबाजी आणि दर शनिवारी तेवढ्याच कोटींची लेणदेण करणाऱ्यांनी रोकड कुठे दडवून ठेवली, ते गुलदस्त्यात आहे. पोलिसांनी पहिल्या दिवशी केवळ चार ते पाच लाख रुपये जप्त केले. उर्वरित रक्कम जप्त करण्यासाठी पोलिसांना आरोपी गवसत नाही की त्यांनी रोकड लपवून ठेवले ते स्थान दिसत नाही, ते कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डब्बाफोड कारवाईबद्दल शहर पोलिसांचे कौतुक केले आहे. त्यामुळे पोलीस नोटांच्या पोत्यांनी भरलेले गोदाम शोधण्यात यशस्वी ठरतील, अशी अपेक्षा आहे.
१०० टक्के बेईमानीचा डब्बा
By admin | Published: May 16, 2016 3:03 AM