नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाने १ सप्टेंबरपासून शहरात मोकाट डुकरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. तमिळनाडूच्या पथकाने तीन दिवसात १०० हून अधिक डुकरे पकडली होती. शनिवारी पकडलेली डुकरे तामिळनाडूला रवाना करण्यात आली.
नागरिकांच्या तक्रारी विचारात घेता मोकाट डुकरे पकडण्याची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. पहिल्या दिवशी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स कार्यालय परिसरातील नाला, आरटीओ नाला, गिट्टीखदाण, केटीनगर भागातून १८ डुकरे पकडली होती. दुसऱ्या दिवशी बीएसएनएल कार्यालय, आरटीओ नाला, महाराजबाग परिसरातून ३२ मोकाट डुकरे पकडली. तर शुक्रवारी सोनेगाव, मनीषनगर, चिंचभुवन परिसरातून ५० डुकरे पकडली. पकडलेले सर्व डुकरे ट्रकमधून तामिळनाडूकडे रवाना करण्यात आली आहे.
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवान व पोलिसांच्या उपस्थितीत २५ जाणांच्या पथकामार्फत ही मोहीम राबविली जात आहे. यापूर्वी २०१९ मध्ये जवळपास ५०० डुकरे पकडण्यात आले होती. आता पुन्हा मोहीम राबविली जात असल्याची अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे नोडल अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.