लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसामान्य विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करीत असताना ऐकण्यास व बोलण्यास असमर्थ असलेल्या मूकबधिर विद्यार्थ्यांनीही दहावीच्या निकालातून आपल्या गुणवत्तेची चमक दाखवून दिली आहे. सरस्वती मंदिरद्वारा संचालिततुळशीबाग रोड, रेशीमबाग येथील कल्याण मूकबधिर विद्यालयातील दहावीचे सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयातील २० विद्यार्थी यावर्षी परीक्षेला बसले होते, त्या सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. यातील आतेरा अंसारी या विद्यार्थिनीने ७२.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर भूमिता वाघ या मुलीने ७०.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक प्राप्त केला. याशिवाय विद्यालयाच्या १२ विद्यार्थ्यांनी ६० टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहेत. या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा शैलजा सुभेदार, उपाध्यक्षा डॉ. विभावरी दानी, सचिव सुभदा आंबेकर, कोषाध्यक्ष अंजली लघाटे, शाळाप्रमुख मालू क्षीरसागर यांच्यासह शिक्षकांनी अभिनंदन केले. दिव्यांग असले तरी सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्यातही गुणवत्ता असल्याचेच या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.