लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील नॉन नेटवर्क वस्त्यामध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो. टँकरवरील खर्च कमी व्हावा, यासाठी डिसेंबर २०२० पर्यत १०० टँकर बंद होणे अपेक्षित होते. मात्र बंद तर नाहीच उलट टँकर वाढविण्यासाठी मनपातील सत्तापक्षातील काही नेत्यांकडून दबाव आणला जात आहे.
दीड वर्षापूर्वी ३६५ टँकर होेते. यावर वर्षाला २८ ते ३० कोटींचा खर्च केला जात होता. नेटवर्क वाढल्याने टँकरव्दारे पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च कमी करण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके यांनी २०२० मध्ये १२० टँकर बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे वर्षाला १० ते १२ कोटींची बचत झाली. झलके यांनी कळमना, नारा, वांजरा येथील जलकुंभांची कामे पूर्ण करून डिसेंबर २०२० पर्यत पुन्हा १०० टँकर बंद करणार असल्याचे सांगितले होते.
मात्र पदाधिकारी बदलताच टँकर लॉबी सक्रिय झाली. पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून टँकर वाढविण्यासाठी दबाव आणत आहे. विशेष म्हणजे काही नगरसेवकांचेही टँकर असल्याने बंद केलेले टँकर सुरू करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला जात आहे.
.....