लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : रिधाेरा (ता. काटाेल) शिवारात असलेला जाम नदीवरील जाम प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता २९ दलघमीची असून, सध्या या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. मागील आठवड्यात याच प्रकल्पात केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक हाेता. चार दिवसात ७५ टक्के पाण्याची आवक झाल्याने हा प्रकल्प १०० टक्के भरला आहे.
मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने या प्रकल्पात मागील आठवड्यापर्यंत केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला हाेता. दरम्यान, बुधवार व गुरुवारी काेसळलेल्या पावसामुळे यात ७५ टक्के पाणी गाेळा झाले आणि हा प्रकल्प चार दिवसात ओव्हरफ्लाे झाला. या प्रकल्पातून काटाेल शहर व काेंढाळीसह काही गावांना पिण्यासाठी तर काटाेल व नरखेड तालुक्यातील काही गावांना ओलितासाठी पाणी दिले जाते. प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा जमा झाल्याने पिण्याच्या पाण्यासाेबतच ओलिताची चिंता मिटली आहे.
...
२.५३ क्युमेस पाण्याचा ओव्हरफ्लाे
या प्रकल्पाची जिवंत पाणीसाठा क्षमता २४.३० दलघमी तर मृत पाणीसाठा क्षमता ४.७ दलघमी आहे. जाम नदीच्या उगमाकडे आजवर ३६८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली आहे. हा ‘नाॅन गेटेड स्पिल वे’ (गेट नसलेला) प्रकल्प आहे. याच्या ‘स्पिल वे वॉल’वरून दाेन सेंमीचा ओव्हरफ्लो सुरू असून, त्यातून २.५३ क्युमेस पाणी थेट नदीच्या पात्रात जात आहे.
...
या गावांना सतर्कतेचा इशारा
जाम नदीच्या पात्रात प्रति सेकंद २.५३ क्युमेस पाणी जात असल्याने जाम नदीकाठच्या रिधोरा, सावळी, काटोल, खापरी (खुर्द), नायगाव (धाेटे), दिग्रस, वडविहिरा (लहान), वाढोणा, भिष्णूर, थाटुरवाडा, रोहणा, भारसिंगी, नारसिंगी, सहजापूर, जलालखेडा, पेठ इस्माईलपूर तसेच या प्रकल्पाचा कालवा असलेल्या पारडसिंगा, जामगाव, मेंढला, सिंजर, उमठा, खरबडी, महेंद्री या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
110921\img-20210911-wa0102.jpg
फोटो काटोल तालुक्यातील रिधोरा स्थित जाम प्रकल्प असा तुडुंब भरला असून ओव्हरफ्लो झाला आहे