नियमबाह्य कारवाईचा आरोप : अप्पर कामगार आयुक्तांकडे तक्रारवाडी : औद्योगिक वसाहतीतील कास्टवेल इंडस्ट्रीजमधील १०० कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. कंपनी व्यवस्थापनाने केलेली ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचा आरोप कामगारांनी केला असून, या संदर्भात कामगारांनी अप्पर कामगार आयुक्त पानबुडे यांच्याकडे तक्रार केली आहे.सदर कामगार या कंपनीमध्ये किमान पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. ते १२ तास काम करीत असून, त्यांना वेतन मात्र आठ तासांचे दिले जायचे. कंपनीतील व्यवस्थापक एलआयसी काढण्यासाठी कामगारांकडे तगादा लावायचे. कामगार त्यांच्या म्हणण्यानुसार व्यवस्थापकाच्या नातेवाइकाकडून विमा काढत नसल्याने त्यांना त्रास दिला जायचा. काही कामगारांनी नोकरी वाचविण्यासाठी त्यांच्याकडून विमा काढला. दरम्यान, किरकोळ कारणावरून व्यवस्थापकाने २१ फेब्रुवारी रोजी भारत राठोड नामक कामगाराला शिवीगाळ करून मारहाण केली व कंपनीबाहेर काढले. दुसऱ्या दिवशी त्या कामगाराला कामावर घेण्यापूर्वी माफी मागण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे सदर घटनेच्या निषेधार्थ १०० कामगार दिवसभर प्रवेशद्वाराजवळ उभे होते. सदर कामगार याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता, त्यांना कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली, असेही अप्पर कामगार आयुक्त पानबुडे यांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणीही करण्यात आली. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे मधू मानके, राजेश जिरापुरे, श्याम मंडपे, धनराज देवके, दिनेश उईके यांच्यासह दिलीप पाटणकर, केशव पानसे, शालिक उईके, भारत राठोड, पंजाबराव धोटे, मनोज कोठे आदी कामगारांचा समावेश होता. (प्रतिनिधी)
१०० कामगारांना कामावरून काढले
By admin | Published: March 05, 2016 3:14 AM