नागपूर : दोन वर्षांच्या कालावधीनंतर नागपुरात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनासाठी कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. अधिवेशनाच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात नियोजनाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागांतून १० हजार पोलीस कर्मचारी व अधिकारी नागपुरात येणार आहेत. याशिवाय नागपुरातील पोलीसदेखील तैनात राहणार आहेत.
हिवाळी अधिवेशन काळात नागपूर पोलिसांची परीक्षा राहणार आहे. अधिवेशन काळात विधिमंडळावर मोर्चे काढण्यात येतात. काही मोर्चे आक्रमक झाल्याचे याअगोदर दिसून आले आहे. व्हीव्हीआयपी, व्हीआयपींच्या सुरक्षेसोबतच शहरातील वाहतूक व्यवस्था, मोर्चे पॉईंटवरील गर्दी इत्यादी आव्हाने पोलीस विभागासमोर राहणार आहेत. यासंदर्भात गृह विभागातील अधिकाऱ्यांची बैठक झाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकांदरम्यान सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. राज्यातील विविध भागांतून १० हजार पोलीस नागपुरात येतील. त्यात ५०० अधिकाऱ्यांचा समावेश असेल. मोर्चा पॉईंट्स, धरणे मंडप इत्यादी ठिकाणी पोलीस तैनात करण्यात येतील. याशिवाय वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठीदेखील नियोजन करण्यात येणार आहे.
पोलिसांच्या व्यवस्थेचे आव्हान
इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेरून पोलीस अधिकारी व कर्मचारी येणार असल्याने त्यांची व्यवस्था करण्याचे आव्हान राहणार आहे. या सर्वांची योग्य व्यवस्था करण्यात येईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.