योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राज्यातील विविध महामार्गांवरील अपघातानंतर राज्यातील ब्लॅक स्पॉट्सचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील महामार्गांवर अपघातप्रवण १ हजार ४ ब्लॅक स्पॉट्स आहेत. यातील केवळ २५ टक्के ‘स्पॉट्स’वर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. राज्य शासनातर्फेच ही माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील अपघातांच्या मुद्द्यावर अनेकदा मंथन झाले आहे. महामार्गांची स्थिती सुधारत असताना ब्लॅक स्पॉट्सदेखील वाढत आहेत. समृद्धी महामार्गावरदेखील अनेक अपघात झाले व अनेकांचा बळी गेला. काही वेळा अपघात झाल्यावर लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागते. विधान परिषदेत रमेश कराड, प्रवीण दटके, उमा खापरे आदी सदस्यांनी या मुद्द्यावर तारांकित प्रश्न मांडला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच ही माहिती दिली आहे. परिवहन आयुक्त कार्यालय, एनएचएआय तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील महामार्गांवरील ब्लॅक स्पॉट्सचा डेटा एकत्रित करण्यात आला आहे. २५९ ब्लॅक स्पॉट्सच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. २८९ ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण करण्याचे काम सुरू आहे तर २०९ ठिकाणी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
-एसटी अपघातात ३४३ जणांचा मृत्यू
२०२२-२३ या कालावधीत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे ३ हजार १४ अपघात झाले. त्यातील २८३ अपघात प्राणांतिक होते तर १ हजार ३६९ अपघात गंभीर होते. या अपघातांमध्ये ३४३ व्यक्तींचा मृत्यू झाला. मृत्यूमुखी पडलेले २२ जण प्रवासी होते, १२ एसटी कर्मचारी होते, ८६ जण पादचारी होते तर ९७९ प्रवासी इतर वाहनांमधील होते. यातील एकही अपघात एसटीच्या बसेसमुळे झालेले नाहीत, असा दावा शासनातर्फे करण्यात आला आहे.