नॉन कोविड रुग्ण अडचणीत
नागपूर : मेयोमध्ये कोविड रुग्णांसाठी ६०० तर मेडिकलमध्ये हजार खाटा राखीव आहेत. यामुळे नॉन कोविडचे रुग्ण अडचणीत आले आहेत. नेत्र, कान, नाक व घसा आणि प्लॅस्टिक सर्जरीच्या रुग्णांसाठी १०वर खाटा नाहीत. यामुळे गंभीर नसलेल्या रुग्णांना तारीख देऊन बोलविले जात आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
‘सुपर’चे एक प्रवेशद्वार बंदच
नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे एक प्रवेशदार मागील दीड वर्षापासून बंद आहे. सिमेंट रस्त्याच्या कामासाठी हे प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते. परंतु रस्त्याचे काम पूर्ण होऊन आता सहा महिन्यांवर कालावधी झाला असताना द्वार बंद ठेवल्याने रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
कचऱ्याची गाडी घरापासून दूर
नागपूर : मनपा धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या नवीन बाभुळखेडा वसाहतीत कचरागाडी घराघरांजवळ जात नाही. वसाहतीतील तीन मुंडी झेंडाजवळ गाडी उभी केली जाते. जास्त वेळही गाडी उभी राहत नसल्याने दूरवरच्या नागरिकांना दोन कचऱ्याच्या डब्याचे वजन पेलत धावत गाडीजवळ यावे लागते. यातच पहाटे ६.३० वाजता कचरागाडी येते. यावेळी अनेक नागरिक झोपेत राहतात. यामुळे मोठ्या संख्येत कचरा अजनी रेल्वे क्वॉर्टरच्या परिसरात टाकला जातो. मनपा आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी त्रस्त नागरिकांची मागणी आहे.