लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सव्वा कोटीचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली एका कंपनी मालकाचे ठगबाजांनी १०.४२ लाख रुपये हडपले. ओमकारनगरातील श्रीपाद नारायण सेनवई (वय ५५) हे त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी कर्ज मिळविण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांना आरोपी ईशा गर्ग, आशिष गर्ग आणि साक्षी गोयल यांनी ८ सप्टेंबर २०२० ला एक कोटी ३० लाखाचे कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले. त्याबदल्यात वेगवेगळ्या नावाखाली २ ऑक्टोबर २०२० पर्यंत आरोपींनी सेनवई यांच्याकडून १० लाख ४२ हजार ७८१ रुपये हडपले. आरोपी कर्जाची रक्कम न देता वेगवेगळे कारण सांगून सारखी पैशाची मागणी करीत असल्याने सेनवई यांनी त्यांना आपली रक्कम परत मागितली तेव्हा आरोपींनी त्यांच्यासोबत संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने सेनवई यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी आरोपी ईशा आणि आशिष गर्ग तसेच साक्षी गोयल या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.