लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुरखेडा, सिरोंचा, भामरागड, जिमलगट्टा...ही सर्व गडचिरोली जिल्ह्याच्या निबिड अरण्यात वसलेली गावे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून फार लांब राहिलेली. अशा या अतिदुर्गम गावातील विवाहइच्छुकांना एकत्र आणून त्यांच्या आयुष्याची ‘नवीन सुरुवात’ आनंददायी करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून, रविवारी २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गडचिरोलीच्या अभिनव लॉन येथे आदिवासी समाजातील १०५ जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.मैत्री परिवार संस्था, नागपूर, गडचिरोली पोलीस, धर्मादाय आयुक्त कार्यालय, नागपूर व साई भक्त साई सेवक परिवार, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे, या सामूहिक विवाह सोहळ्यात नक्षल चळवळीपासून फारकत घेऊन एका नवीन आयुष्याचा प्रारंभ करणाऱ्या दोन जोडप्यांचेही शुभमंगल होणार आहे. गुरुवारी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, पोलीस निरीक्षक युवराज पत्की, धर्मादाय आयुक्त विजयसिंग चौव्हाण, साई भक्त साई सेवक परिवारचे राजीव जैयस्वाल उपस्थित होते.मैत्री परिवार संस्थेने तीन वर्षांआधी गडचिरोली जिल्हा दत्तक घेतला. तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने आदिवासी भागामध्ये वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक उपक्रम, कपडे व गरजेच्या वस्तूंचे वाटप, असे विविध उपक्रम या संस्थेमार्फत तेथे राबविले जात आहे. याच क्रमात आता सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी होणाºया या सोहळ्यासाठी ३२ हजार चौरस फुटांचा भव्य विवाह मंडप, १०५ जोडपी म्हणजे एकूण २१० जणांची भव्य पंगत, २० हजार फुटांचा जेवणाचा स्वतंत्र मंडप अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
१० विभागातील ५५ गावांच्या वर-वधूंचा सहभागया सामूहिक विवाह सोहळ्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे एकूण १० विभाग करण्यात आले असून, या विभागांच्या ५५ गावांतील २१० वर-वधूंचे लग्न या सोहळ्यात लागणार आहे. यामध्ये गडचिरोली विभागातून १२ जोडपी, कुरखेडा-१४, धानोरा-१०, पेंढरी कॅम्प-११, अहेरी-८, एटापल्ली-८, हेडरी-८, भामरागड-१५, जिमलगट्टा-१० तर सिरोंंचा विभागातून ९ जोडप्यांचा समावेश आहे.
लग्नानंतरही स्वीकारणार पालकत्वया आदिवासी तरुण-तरुणींचे लग्न जुळवून आणण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी पुढाकार घेतला आणि हा सोहळा घडून आला. या सोहळयाला मदत करणाऱ्या संस्था केवळ लग्न लावून मोकळया होणार नसून या सर्व जोडप्यांचे पुढच्या दीड वर्षापर्यंत पालकत्व त्या स्वीकारणार आहेत. या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात कुठलीही अडचण आली तर त्यासाठी या संस्थांतर्फे मदत केली जाणार आहे. लग्नप्रसंगीही नवऱ्या मुलीला मंगळसूत्र, संसारोपयोगी भांडे, वर-वधूंचे कपडे, त्यांच्या आई-वडिलांचा अहेर असा सर्व खर्च आयोजक संस्था करणार आहेत.