लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : नागपूर मेट्राेच्या कामासाठी वापरण्यात येणारे लाेखंडी राॅड चाेरून नेणाऱ्या दाेन चाेरट्यांना वाडी पाेलिसांच्या पथकाने शुक्रवारी (दि. २०) रात्री अटक केली. त्यांनी २ ऑगस्टच्या रात्री नागलवाडी परिसरातील ५८ हजार ८०० रुपये किमतीचे १०५ लाेखंडी राॅड चाेरून नेले हाेते.
विशाल विश्वनाथ रोकडे (२७) व बबलू खुशाल उमक (२५) दाेघेही रा. इंदिरानगर झोपडपट्टी, नागलवाडी, ता. नागपूर (ग्रामीण), अशी अटक करण्यात आलेल्या चाेरट्यांची नावे आहेत. नागलवाडी परिसरात नागपूर मेट्राेचे काम सुरू आहे. त्यामुळे एफकॉस इन्फ्रास्ट्रक्चर लिमि. या कंत्राटदार कंपनीने त्या परिसरात काही साहित्य ठेवले आहे. २ ऑगस्ट राेजी तिथे ठेवलेल्या लाेखंडी राॅडपैकी प्रत्येकी १४ किलाेचे १०५ राॅड कमी असल्याचे सुपरवायझर सचिन शामराव मून (३५, रा. वडधामना) यांच्या लक्षात आले.
ते राॅड चाेरीला गेल्याचे स्पष्ट हाेताच त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. त्या राॅडची एकूण किंमत ५८ हजार ८०० रुपये असल्याचेही त्यांनी वाडी पाेलिसांना सांगितले. वाडी पाेलिसांनी भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला. ही चाेरी विशालने केल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने बबलूचे नाव सांगितल्याने दाेघांनाही अटक करण्यात आली. ही कारवाई पाेलीस उपनिरीक्षक साजिद अहेमद, सुनील मस्के यांच्या पथकाने केली.