लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तृतीयपंथी सुद्धा आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. नागपूरचाच विचार केला तर सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा वावर वाढला आहे. त्याचाच परिणाम मतदार यादीवरही दिसून येतो. मतदार म्हणून तृतीयपंथी आता आपल्या नावाची नोंद करू लागले आहेत. ही संख्या कमी असली तरी प्रेरणादायी आहे. निवडणूक आयोगाने मागील दोन महिन्यात राबवलेल्या विशेष नोंदणी अभियानाचाही यात मोठा वाटा आहे, हे विशेषनागपूर जिल्ह्यातील मतदार यादी ३१ जानेवरी २०१९ रोजी जारी करण्यात आली होती. तेव्हा जिल्ह्यातील मतदारांची संख्या ४० लाख २४ हजार १९७ इतकी होती. यानंतरही मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होती. यादरम्यान दोनदा विशेष मतदार नोंदणी मोहीम सुद्धा राबवण्यात आली. याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. निवडणूक विभागाने या निवडणुकीसाठी ३० मार्च २०१९ रोजी पर्यंतची अंतिम यादी आता जारी केली आहे. ती आता ४० लाख ८१ हजार २७९ इतकी झाली आहे. म्हणजेच ५७ हजार ८२ मतदार पुन्हा वाढले आहे. नागपूर जिल्ह्यातील नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या आता २१ लाख ६० हजार २३२ इतकी झाली आहे. यामध्ये १० लाख ९६ हजार ३२९ इतके पुरुष ाहेत. तर १० लाख ६३ हजार ८२८ महिला मतदार आहेत. तसेच रामटेक लोकसभा मतदार संघात आता १९ लाख २१ हजार ४७ इतकी झाली आहे. यात ९ लाख ९६ हजार ४५६ पुरुष मतदार तर ९ लाख २४ हजार ५६१ महिला मतदार आहेत.नागपूरमध्ये ३३,६५८ तर रामटेकमध्ये २३,४२४ मतदार वाढलेमतदार नोंदणीसाठी राबवण्यात आलेल्या विशेष अभियानाचा चांगले परिणाम दिसून आले आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात दोन महिन्यात पुन्हा ३३,६५८ मतदार वाढले आहेत. तर रामटेकमध्ये २३,४२४ मतदार वाढले.तृतीयपंथी मतदारही वाढले३० जानेवारी २०१९ रोजी जारी करण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये नागपूर जिल्ह्यात एकूण ८९ तृतीयपंथी मतदारांची संख्या होती. ती सुद्धा आता वाढून १०५ वर पोहोचली आहे. पूर्वी नागपूरमध्ये ६ तृतीयपंथी मतदार होते. तर रामटेकमध्ये २३ होते. आता रामटेकमध्ये ३० आणि नागपूरमध्ये ७५ तृतीयपंथी मतदार आहेत. नागपुरात तृतीयपंथी मतदारांची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक आहे. परंतु मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी आवश्यकता असलेले कागदपत्र त्यांच्याकडे नसल्याने त्यांची नोंदणी होऊ शकली नाही, यादृष्टीनेही प्रशासनाने उपायायेजना करण्याची गरज असल्याचे सांगितले जाते.