लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सतरंजीपुरा व मोमिनपुरानंतर हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या रामेश्वरी रोड पार्वतीनगरातील १०६ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या वसाहतीसह आजूबाजूच्या वसाहती सील केल्याने व २३० वर नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.पार्वतीनगर येथील २२वर्षीय युवकाचा सहा मे रोजी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या युवकाला गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला व सर्दीची लक्षणे होती. हा रुग्ण ‘स्किझोफ्रेनिया’नेही ग्रस्त होता. त्याला झटके येत असल्याने या आजारावरही उपचार सुरू होते. त्याच्या कानामध्ये इन्फेक्शन झाल्याने बुधवारी तो मेडिकलच्या अपघात विभागात आला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर व त्याच्या लक्षणांवरून त्याची कोविड संशयित म्हणून नोंद केली. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यामुळे पार्वतीनगरात खळबळ उडाली. महानगरपालिकेने धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३५ मधील पार्वतीनगर, रामेश्वरी रोड, त्रिशरण चौक आदी परिसर सील केला. या शिवाय मृताच्या नातेवाईकांसह आजूबाजूच्या घरातील २३० लोकांना क्वारंटाईन केले. या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेयोच्या प्रयोगशाळेत आज पहिल्या फेरीत ५९ तर दुसऱ्या फेरीत ४७ असे एकूण १०६ नमुने तपासले असता सर्वच नमुने निगेटिव्ह आले. यामुळे ‘हॉटस्पॉट’ ठरू पाहणाऱ्या या वसाहतीतील नागरिकांसह आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. उर्वरित नमुन्यांचा अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे.
नागपूरच्या पार्वतीनगरातील १०६ नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 1:23 AM