नागपूर : कॅनडात नोकरी लावून देण्याच्या नावाखाली सायबर गुन्हेगारांनी पती-पत्नीला १०.६० लाखांचा गंडा घातला. व्हिजा व इतर प्रक्रियांच्या नावाखाली आरोपींनी हे पैसे उकळले. मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
सदय्या चिन्नाहून मन्तुशेषना (३२, नागेश सोसायटी, मानकापूर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते व त्यांची पत्नी विदेशात नोकरीच्या शोधात होते. १२ एप्रिल रोजी सदय्या व त्यांच्या पत्नीला अनुक्रमे ९२३३०२५५९१ तसेच ६४३४१६९९०० या क्रमांकावर मॅसेजेस आले. त्यात नोकरीबाबत नमूद केले होते. आरोपींनी त्यांना फॉलो करायला लावले. त्यानंतर आरोपींनी कॅनडात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर व्हिजा, कागदपत्रे व इतर प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली वेळोवेळी १०.६० लाख रुपये उकळले. मात्र त्यांनी संबंधित दांपत्याला नोकरी लावून दिली नाही. त्यानंतर ते वारंवार टाळाटाळ करायला लागले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सदय्या यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात आयटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.