लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ताजश्री आॅटोमोबाईल्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून १०.६८ लाखांची रोकड लुटणारा कुख्यात गुंड राहुल राजू भास्कर याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी यश मिळवले.९ मे च्या रात्री ताजश्रीचे कर्मचारी जयवंत मधुकर खोडे आणि दुर्गेश वासुदेव पारधी १० लाख, ६८ हजार, ८२६ रुपयांची रोकड घेऊन शोरूमचे मालक राहुल रमेश भुते यांच्या घरी जात होते. शोरूम पासून काही अंतरावरच राहुलने आपल्या तीन साथीदारांच्या मदतीने खोडे आणि पारधीवर हल्ला करून १० लाखांची रोकड लुटून नेली होती. धंतोली पोलिसांत या प्रकरणी लुटमारीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी या लुटमारीतील भंडारा येथील कृष्णा उराडे नामक आरोपीला अटक करून त्याच्याकडून दोन लाख रुपये जप्त केले होते. शुक्रवारी सकाळी राहुल केडीके कॉलेजजवळ असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच पोलीस पथकाने तेथे जाऊन राहुलच्या मुसक्या बांधल्या. त्याला धंतोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले. राहुल यापूर्वी ताजश्री होंडामध्येच कार्यरत होता. मालक आपल्याला वारंवार छोट्या-छोट्या कारणावरून अपमानित करीत होता. त्यामुळे मालकाला धडा शिकविण्यासाठी ही लुटमार केल्याची प्राथमिक माहिती राहुलने पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक किरण चौगुले, प्रदीप अतुलकर, उपनिरीक्षक मनिष वाकोडे, सूरज पाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
१०.६८ लाख लुटणारा गुन्हेगार जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:44 AM
ताजश्री आॅटोमोबाईल्सच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून १०.६८ लाखांची रोकड लुटणारा कुख्यात गुंड राहुल राजू भास्कर याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी यश मिळवले.
ठळक मुद्देनंदनवनमध्ये पकडले : गुन्हेशाखेची कारवाई