नागपूर :महावितरणच्या नागपूर शहर मंडलांतर्गत वीजचोरीविरोधात संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकांकडून संयुक्त मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहीमेत अवघ्या पाच दिवसांत सुमारे ३१.६५ लाखाच्या १०७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय ५ ठिकाणी अनियमितता आढळून आली आहे.
नागपूर शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील संघर्ष नगर. लष्करीबाग व यशोधरा नगर, महाल विभागातील ताजबाग व हसनबाग, गांधीबाग विभागातील मोमीनपुरा व अन्सार नगर आणि खोग्रेसनगर विभागातील जयताळा, हुडकेश्वर या भागातील वीज हानी अधिक असलेल्या वाहिन्यांवर गेल्या ४ सप्टेंबरपासून ही मोहीम कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आली अहे.
याभागातील वीज वाहिन्यांवरील वीजहानीचे प्रमाण बघता महावितरणने या भागात वीजचोरीविरोधात धडक मोहीम सुरु केली आहे. महावितरणच्या पथकांनी या भागातील अनेक वीज जोडण्यांची तपासणी केली. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये सुमारे ३१.६५ लाख मुल्याच्या तब्बल १०७ वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. याशिवाय कलम १२६ अन्वये सुमारे १.३ लाख मुल्याच्या ५ ठिकाणी वीज वापरातील अनियमितता आढळून आली आहे. याप्रकरणी संबंधित ग्राहकांना वीजचोरीपोटीचा दंड भरण्याची सुचना करण्यात आली आहे.
महावितरणचे प्रदेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या मार्गदर्शनात आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या नेतृत्वात ही कारवाई सुरू आहे.