नागपूर : आंध्र प्रदेशातून दिल्लीला कारने गांजा घेऊन जात असताना दोन युवकांना एनडीपीसी सेलने पकडले आहे. त्यांच्याकडून १०७ किलो गांजा व कारसह २० लाख रुपये माल जप्त केला आहे.
एनडीपीएस सेलकडून २४ तासात ही दुसरी मोठी कारवाई आहे. आरोपींची नावे भुरा नन्हे मलिक (वय २८) व विकासकुमार जयप्रकाश सिंह (२७, रा. जहांगीरपूर, दिल्ली) अशी आहेत. एनडीपीएस सेलला विशाखापट्टणम येथून कारने काही लोक गांजा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्याआधारे पोलीस जबलपूर महामार्गावर दबा धरून बसले होते.
पोलिसांनी (डीएल-१-सीक्यू-८४६०) या क्रमांकाच्या कारला थांबविले. कारमध्ये आरोपी बसले होते. पोलिसांना सुरुवातीला काहीच मिळाले नाही; पण कारचे सुक्ष्म निरीक्षण केले असता, सीटच्याखाली तयार केलेल्या पॅनलमध्ये गांजा लपविला होता. पोलिसांनी पॅनल उघडून १०७ किलो गांजा जप्त केला. गांजाची किंमत १६ लाख रुपये आहे. पोलिसांनी गांजासह कारही जप्त केली. दोन्ही आरोपी गांजा तस्करीच्या मोठ्या रॅकेटशी जुळलेले आहेत.
आरोपींनी सांगितले की, विशाखापट्टणममधून कार घेऊन येण्यास सांगितले होते. ग्वालियर येथे त्यांना गांजाची डिलेव्हरी द्यायची होती. आरोपी गांजा तस्करीत सामील असलेल्या अन्य लोकांची माहिती देण्यास नकार देत आहेत. यापूर्वीही दिल्ली व उत्तर प्रदेशातील युवकांकडून गांजाची तस्करी करताना पकडले आहेत.