लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भात कोरोनाचे संकट आणखीच गडद होत चालले असून कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी १०७७ नवे रुग्ण आढळून आले तर २६रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या २६७२५ झाली असून मृतांची संख्या ७८८वर पोहचली आहे. नागपूर, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात रुग्णवाढीचा वेग कायम आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा चढता आलेख आरोग्य यंत्रणेसमोर नवे आवाहन उभे करीत आहे. आज ७२७ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ११७०९ झाली असून मृतांची संख्या ४२० वर पोहचली आहे.
दिलासादायक म्हणजे, बाधित रुग्णांपैकी ५५१६ रुग्ण बरे झाले आहेत. नागपूर नंतर सर्वाधिक रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात दिसून आले. ७४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या २०३२ झाली आहे. दोन रुग्णाचा मृत्यूने मृतांची संख्या ५६झाली आहे. १३४७ रुग्ण बरे झाले आहेत. अकोला जिल्ह्यात ४७ रुग्ण पॉझिटिव्ह व दोन रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३१७६ तर मृतांची संख्या १३१ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात रोजच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. ४४ रुग्णांची नोंद झाली असून रुग्णांची संख्या ९८८ वर पोहचली आहे. एका रुग्णाच्या मृत्यूने जिल्ह्यातील मृतांची संख्या नऊ झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यात बाधितांचा वेग कायम आहे. ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोन रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या २०६७ तर बळींची संख्या ३८झाली आहे. अमरावती जिल्ह्यात बुधवारी रुग्णसंख्येने शंभरी ओलांडली होती, मात्र आज रुग्णसंख्येत घट आली आहे. ३३ रुग्ण पॉझिटिव्ह आले असून रुग्णांची संख्या ३३४६ झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २४ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या ८०१ वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात आज रुग्णसंख्या वाढली. ३० रुग्णांचे निदान झाले. रुग्णसंख्या ३६७ झाली आहे. वाशिम जिल्ह्यात २८ रुग्णांची नोंद झाली असून बाधितांची संख्या १०४९ झाली आहे. भंडारा जिल्ह्यात १३ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ४६३ तर मृतांची संख्या तीन झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात १९ रुग्ण पॉझिटिव्ह आले, रुग्णसंख्या ७२७ वर पोहचली आहे.