निशांत वानखेडे
नागपूर : गर्दीच्या ठिकाणी, रेल्वे किंवा सार्वजनिक स्थळी अतिरेक्यांकडून घातपाताचे मनसुबे ठेवून बाॅम्ब ठेवला जाताे. अशावेळी ताे शाेधण्यासाठी बाॅम्ब शाेध पथकातील जवानांना जीव धाेक्यात घालून ताे शाेधावा व नष्ट करावा लागताे. मात्र यापुढे असा धाेका पत्करावा लागणार नाही. एक राेबाेट बाॅम्ब किंवा बेवारस बॅग शाेधून ते सहज नष्ट करेल.
भारतीय संरक्षण संशाेधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) ने एक विशेष राेबाेट विकसित केला आहे. ‘कन्फाईन्ड स्पेस रिमाेटली ऑपरेटेड व्हेइकल’ असे या राेबाेटचे नाव आहे. डीआरडीओच्या वैज्ञानिक कथिका राॅय यांनी याबाबत माहिती दिली. हा राेबाेट २०० ते ५०० मीटर अंतरावरून रिमाेटने माॅनिटर करता येईल. १०० किलाे वजनाच्या या राेबाेटला मल्टिपल सीसीडी कॅमेरा लागलेला आहे. राेबाेटला ‘हाय प्रेशर वाॅटर गन’ लागलेली आहे, ज्याद्वारे बाॅम्ब डिफ्यूज करता येईल किंवा हा राेबाेट ताे बाॅम्ब निर्मनुष्य स्थळापर्यंत नेऊन नष्ट करेल. या राेबाेटच्या सर्व चाचण्या झाल्या असून लवकरच सैन्यात त्याचा समावेश हाेण्याची शक्यता राॅय यांनी व्यक्त केली. पाेलिस विभागाच्या पथकातही त्याचा समावेश हाेऊ शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.