योगेश पांडे
नागपूर : राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. राज्याला सातत्याने वर्षभरात पाऊस, पूर व वादळाचा तडाखा बसत असून, मागील सव्वातीन वर्षांत या नैसर्गिक आपत्तींमध्ये साडेआठशेहून अधिक लोकांनी जीव गमावला; तर मागील चारच महिन्यांत १०८ बळी गेले. याशिवाय लाखो घरांचेदेखील नुकसान झाले आहे. राज्य शासनाने केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविलेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
एप्रिल ते १९ जुलै या कालावधीत महाराष्ट्रात पाऊस, पूर, वादळामुळे १०८ जणांचा जीव गेला; तर १८९ जनावरे पाण्यात वाहून गेली. याशिवाय १ हजार ४१२ घरांची पडझड झाली. २०१९-२० पासूनची आकडेवारी आणखी विदारक आहे. या कालावधीत राज्यात मोठ्या चक्रीवादळांनी धडक दिली. त्यामुळे झालेल्या पर्यावरणीय बदलांमुळे अनेक भागांत अतिवृष्टीदेखील झाली. २०१९-२० ते १९ जुलै २०२२ पर्यंत ८९८ नागरिकांचा निसर्गाच्या तडाख्यात जीव गेला. २०२१-२२ मध्ये सर्वाधिक ३२२ जणांचा मृत्यू झाला. या जवळपास सव्वातीन वर्षांच्या कालावधीत १२ हजार ४३४ जनावरांचा बळी गेला.
लाखो संसार उघड्यावर
सव्वातीन वर्षांच्या कालावधीत, राज्यातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. अधिकृत आकडेवारीनुसार ही संख्या तब्बल ४ लाख ५४ हजार ३०५ इतकी आहे. यात पक्की घरे, झोपड्या यांचा समावेश होता.
साडेसतरा लाख हेक्टरवरील पिकाला फटका
नैसर्गिक आपत्तींचा सर्वांत जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. सव्वातीन वर्षांच्या काळात अतिवृष्टी, चक्रीवादळ, पूर यांमुळे शेतजमिनींचे नुकसान झाले. १७ लाख ८६ हजार हेक्टरवरील पिकाची नासाडी झाली. या अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडले. २०२०-२१ मध्ये सर्वाधिक ११ लाख २८ हजार हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुुकसान
वर्ष : मानवी मृत्यू : जनावरांचा मृत्यू : घरांचे नुकसान : प्रभावित पीकक्षेत्र
२०१९-२० : २५३ : ४,२३० : १,०९,७१४ : ४.१७ लाख हेक्टर
२०२०-२१ : २१५ : ५,८१४ : २,९७,०१३ : ११.२८ लाख हेक्टर
२०२१-२२ : ३२२ : २,२०१ : ४६,१६६ : २.४१ लाख हेक्टर
एप्रिल ते १९ जुलै २०२२ : १०८ : १८९ : १,४१३ : ---
मागील तीन वर्षांत आलेली मोठी चक्रीवादळे
गुलाब, निसर्ग, तौक्ते, क्यार