नागपूर : वाहन चालविताना चालकाला झोपेची डुलकी आल्यामुळे दरवर्षी हजारो प्राणघातक अपघात घडतात. अशा घटना टाळण्यासाठी वरुडमधील दोन विद्यार्थ्यांनी विशेष गॉगल तयार केला आहे. वाहनचालकाने विशिष्ट वेळेपर्यंत डोळे न उघडल्यास हा गॉगल अलार्म वाजवतो. त्यामुळे वाहनचालक तातडीने जागा होऊन वाहनावर नियंत्रण मिळवू शकताे. १०८ व्या इंडियन कॉँग्रेसमध्ये या विद्यार्थ्यांनी हा गॉगल सादर केला आहे.
वैष्णव राऊत व हर्षित अग्रवाल यांनी हा गॉगल तयार केला असून, ते स्कूल ऑफ स्कॉलर्सचे विद्यार्थी आहेत. त्यांनी शिक्षक कौस्तुभ बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. हा प्रयोग चिल्ड्रेन सायन्स काँग्रेसमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. गॉगलमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे व सेंसरचा उपयोग करण्यात आला आहे. अलॉर्म वाजायची वेळ आपल्या मतानुसार निश्चित करण्याची सोय गॉगलमध्ये आहे. विद्यार्थ्यांनी तीन सेकंदाची वेळ निश्चित केली होती. वैष्णवने गॉगल घालून तीन सेकंद डोळे बंद करून ठेवले असता जोरात अलार्म वाजला. हा गॉगल तयार करण्यासाठी केवळ ५०० रुपये खर्च आल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली. वाहनचालकाला झोप लागल्यामुळे होणारे अपघात पाहता या गॉगलचे व्यावसायिक उत्पादन होणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.