नागपूर : दहावीची परीक्षा दिल्यानंतर निकाल कसा लागेल, या चिंतेतून एका १५ वर्षाच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपविल्याची धक्कादायक घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत तुळजाईनगर, गारगोटी परिसरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. मुलीच्या आत्महत्येमुळे तिच्या आईवडिलांवर शोककळा पसरली आहे.
एकता सागर जिभकाटे (वय १५, रा. प्लॉट नं. १४ ए, तुळजाईनगर, गारगोटी परिसर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. एकताच्या कुटुंबात आईवडिल आणि लहान भाऊ आहे. तिचे आई-वडिल मजुरी करतात. तर लहान भाऊ नववीला शिकतो. एकताने दहावीची परीक्षा दिली होती. परंतु मागील पाच-सहा दिवसांपासून तिला सारखी निकाल काय लागतो, याची चिंता वाटत होती. या चिंतेतून तिने शनिवारी २० मे रोजी सकाळी ११ वाजता घरी कोणीच नसताना घराची आतुन कडी लाऊन सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. या प्रकरणी सागर बाबुराव जिभकाटे (वय ४२) यांनी दिलेल्या सुचनेवरून हुडकेश्वरचे पोलिस उपनिरीक्षक माधव गुंडेकर यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे. आत्महत्येपूर्वी एकताने कुठलीही सुसाईड नोट लिहिली नाही. तिच्या या पावलामुळे तिच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला आहे.