लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर पोलिसांच्या एनडीपीएस सेलने गांजा तस्करांच्या जळगाव येथील टोळीला अटक करून ११ लाखाचा गांजा जप्त केला आहे. या टोळीतील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सचिन कैलाश देशमुख (३२), अमित रोहिदास पाटील (३०), दीपक अशोक शेवाळे (३९), योगेश धोंडीराम साळुंखे (३५) जळगाव आणि जय रुपम गोवर्धन (२४) रा. वर्धा अशी आरोपींची नावे आहेत. जळगाव येथील रहिवासी अमित पाटील अनेक दिवसांपासून गांजाची तस्करी करतो. तो या टोळीचा सूत्रधार आहे. तो छत्तीसगड येथील तुरुंगात अडीच वर्षांची शिक्षा भोगून फेब्रुवारी महिन्यात सुटला आहे. त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने टोळी बनविली. आरोपी ६ ते ११ मार्च दरम्यान छत्तीसगडला गांजा खरेदी करण्यासाठी गेले होते. दरम्यान लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे गांजाची डिलीव्हरी झाली नाही. ऑगस्ट महिन्यात आरोपींनी छत्तीसगडच्या तस्करांपासून गांजा खरेदी करण्यासाठी पैसे ट्रान्सफर केले. सोमवारी राजनांदगाववरून ७५ किलो गांजा घेऊन ते नागपूरला पोहोचले. बुटीबोरी येथील एका हॉटेलमध्ये ते थांबले. एका स्थानिक तस्कराला त्यांनी २ किलो गांजा सँपल म्हणून दिला. उर्वरीत ७३ किलो गांजासाठी ते ग्राहक शोधत होते. त्यांचा ग्रामीण भागातील एका तस्कराशी सौदा झाला. त्याला गांजा देण्यासाठी ते मंगळवारी रात्री कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौकात पोहोचले. याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ११ लाख रुपये किमतीचा ७२ किलो ३९८ ग्रॅम गांजा जप्त केला. जय आणि सचिनची चौकशी केली असता त्यांनी इतर साथीदार बुटीबोरी येथील हॉटेलमध्ये असल्याची माहिती दिली. पोलिसांनी धाड टाकून इतर साथीदारांना अटक केली. त्यांच्याकडून इनोव्हा आणि मोबाईल जप्त केले. आरोपींविरुद्ध कपिलनगर ठाण्यात मादक पदार्थ विरोधी कायद्या्नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी या पूर्वीही गांजाच्या विक्रीसाठी नागपुरात आल्याची शंका आहे. त्यांच्याकडून पोलीस माहिती घेत आहेत. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त विवेक मसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सार्थक नेहेते, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव मासळ, सहायक उपनिरीक्षक विजय कसोधन, राजेंद्रसिंह बघेल, हवालदार राजेश देशमुख, प्रदीप पवार, समाधान गीते, नामदेव टेकाम, विनोद गायकवाड, नितीन मिश्रा, कपिल तांडेकर, अश्विन मांगे, राहुल गुमगावकर, समीर शेख, नितीन साळुंखे, राहुल पाटील, रुबीना शेख, पुनम रामटेके यांनी पार पाडली.