लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेने खास उन्हाळी स्पेशल रेल्वे गाड्या चालवल्या. या गाड्यातून १० लाख, ९८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे.
उन्हाळ्यात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढल्यामुळे नियमित रेल्वे गाड्यां व्यतिरिक्त मध्य रेल्वेने देशातील विविध भागात ९२० उन्हाळी स्पेशल रेल्वे गाड्या चालविण्याचे नियोजन केले. त्यानुसार, मार्च २०२४ पासून १८ जूनपर्यंत ८२२ गाड्या चालविण्यात आल्या. यातील ७४ समर स्पेशल ट्रेन महाराष्ट्रातील विविध शहरातून चालविण्यात आल्या. या सर्व गाड्यांमुळे प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. दुसरीकडे या गाड्यांमुळे प्रवाशांची होऊ पाहणारी कोंडीही कमी झाली. मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व गाड्यांमधून १० लाख, ९८ हजार प्रवाशांना त्यांच्या नियोजित प्रवासाचे स्थान गाठता आले.