नागपूर : गत आठवड्यात मौदा तालुक्यात शेतातील जुगार अड्ड्यावर कारवाई झाल्यानंतर आता सावनेर तालुक्यातही असाच प्रकार उघडकीस आला आहे. सावनेर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर कोकर्डा शेतशिवारातील टेकडीवर सुरू असलेला जुगार पकडत ११ जणांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून ६ लाख १२ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सोमवारी (दि. २) गांधी जयंतीला सांयकाळी ही कारवाई करण्यात आली. कोकर्डा शेतशिवारातील टेकडीवर काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच सावनेर पोलिसांच्या पथकाने तिथे धाड टाकली. यात रामदास निमाजी नादगवणे (५०, रा. नवीन गुजरखेडी), संजय भाऊराव जाधव, संजय भाऊराव नारनवरे (४१, रा. जलालखेडा), गौरव देवानंद लोणारे (२६) रा. मोहपा, राजेंद्र मधुकर कुंभारे (३४, रा. धापेवाडा), नंदलाल ईश्वर बाजनघाटे (३९), सिरोंजी, बडेगाव मनोज देवराव बरवळ (३८, रा. धापेवाडा), नरेंद्र रमेश बोकटे (४८, रा. मोहपा), सतीश दादाराव खोब्रागडे (४०, रा. कळमेश्वर), कुणाल कैलास पाटील (३८, रा. वाडी, नागपूर), योगेश संतोष देवते (५१, रा. मोहपा), राकेश धनराज घोरमाडे (२८, रा. कोकर्डा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळाहून पोलिसांनी १७ हजार ३४० रुपये रोख, एक चारचाकी व चार दुचाकी अशी पाच वाहने एकूण किंमत ५ लाख रुपये तसेच एकूण १२ मोबाइल हँडसेट किंमत ९५ हजार असा एकूण ६ लाख १२ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम १२ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे कारवाई केली.