लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी चितारओळी परिसरात ११ पीओपी मूर्ती जप्त केल्या. विक्रेत्यांकडून ५६,००० रुपये दंड वसूल केला.
महापालिकेने पीओपी मूर्ती खरेदी व विक्रीवर बंदी घातली आहे. आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी या संदर्भात नुकतेच आदेश जारी केले होते. असे असूनही काही मूर्ती विक्रेते पीओपी मूर्तींची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, गांधीबाग झोन क्षेत्रातील चितारओळी येथे तपासणी केली असता, हा प्रकार निदर्शनास आला. उपद्रव शोध पथकाने ११ मूर्ती जप्त करून दंड वसूल केला. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नोडल अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले व उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात गांधीबाग झोन पथकाने ही कारवाई केली. जप्त केलेल्या पीओपी गणेशमूर्ती झोनच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्या. दरम्यान, उपद्रव शोध पथकाने सोमवारी दोन प्रतिष्ठावर कारवाई करून १७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. पथकाने ४७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. आयुक्तांच्या निर्देशानुसार झोन शोध पथकांद्वारे ही कारवाई करण्यात आली.