नागपूर : विभागातील नागपूर आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांतील ११ तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी रोगाची लागण झाली आहे. आतापर्यंत फक्त तीन जनावरांचे मृत्यू झाले असून, ते नागपूर जिल्ह्यातील आहे. अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये दक्षतेचे आदेश देण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर, हिंगणा, पारशिवणी, नागपूर ग्रामीण, मौदा, काटोल कामठी या तालुक्यांमधील ६ हजार ४३२ जनावरे निगराणीखाली असून ९७ जनावरांना लागण झाली आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, भद्रावती, वरोरा आणि सावली या चार तालुक्यांमध्ये ३ हजार ९०६ जनावरे देखरेखीखाली असून येथे ५३ जनावरांना लम्पीची लागण झाली आहे.
विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये लसींचा पुरवठा मुबलक करण्यात आला असल्याची माहिती प्रादेशिक पशुसंवर्धनसहआयुक्त डॉ. बलदेव रामटेके यांनी दिली. मंगळवारपर्यंत विभागात ३९,१८७ जनावरांचे लसीकरण झाले असून, गोशाळा आणि मोठे फार्म असलेल्या ठिकाणी लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. अन्य जिल्ह्यांमधेही लसींचा पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
विभागात २० लाखांवर गोधन
नागपूर विभागामध्ये २० लाख ५५ हजार ४७६ गोधन आहे. यात गायी, वासरे आणि बैलांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यात ४ लाख १८ हजार ५४८, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ९१४ गोधनाची नोंद आहे.
...