नागपूर: दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असताना आता जिल्ह्यातील ११ हजार १७ प्रौढ निरक्षरांची परीक्षा घेतली जाणार आहे. उद्या रविवारी जिल्ह्याच्या १३ तालुक्यातील आणि शहरातील पाच शहर साधन केंद्राअंतर्गतच्या ८५५ केंद्रांवर ही तीन तासांची लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या प्रौढांना केंद्र सरकारतर्फे साक्षरतेचे प्रमाणपत्र आणि गुणपत्रकही दिले जाणार आहे.
१५ वर्षांवरील निरक्षरांसाठी नव भारत साक्षरता अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत किती प्रौढ निरक्षर आता साक्षर झाले याची चाचणी घेतली जाणार आहे. ही परीक्षा सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेतली जाणार आहे. जिल्ह्यात ८५५ केंद्र्रावरून ११ हजार १७ परीक्षार्थी परीक्षा देतील. त्यात ३ हजार ८५५ पुरुष तर ७ हजार १३२ महिला परीक्षार्थिंचा समावेश आहे. निरक्षरांना परीक्षेच्या वेळेदरम्यान त्यांना जमेल त्या वेळेत येऊन परीक्षेचा पेपर सोडवायचा आहे. विशेष म्हणजे, त्यांच्यासाठी परीक्षा केंद्रही त्यांच्या राहत्या घरापासून नजिकच्याच अंतरावर देण्यात आले आहे.