नागपूर : शाळा सुटल्यानंतर हसत-खेळत वडिलांच्या दुचाकीवर बसून जात असलेल्या ११ वर्षांच्या वेदच्या मानेभोवती मांजाचा दोर आवळला आणि गळा चिरल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वेदच्या अचानक निघून जाण्यामुळे त्याच्या आईवडिलांना धक्का बसला असून, या घटनेमुळे जरीपटका परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
वेद क्रिष्णा शाहू (११, मिसाळ ले-आऊट, जरीपटका) असे मांजाने गळा चिरल्यामुळे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. वेद जरीपटक्याच्या महात्मा गांधी स्कूलमध्ये इयत्ता पाचवीला शिकत होता. वेदच्या कुटुंबात त्याचे आईवडील आणि श्री नावाचा मोठा भाऊ आहे. वेदचे वडील क्रिष्णा किराणा दुकान चालवितात. शनिवारी दुपारी ४.३० वाजता त्याचे वडील क्रिष्णा वेदला घेण्यासाठी शाळेत गेले. शाळा सुटल्यानंतर त्यांनी वेदला आपल्या ॲक्टिव्हा गाडीवर समोर उभे केले.
दुचाकीने घराकडे जात असताना इंदोरा बाराखोलीजवळ वेदच्या गळ्याला मांजा अडकला आणि क्षणभरातच त्याचा गळा चिरला गेला. वेदच्या मानेतून रक्तस्राव सुरू झाला. त्याच्या वडिलांनी सुरुवातीला त्याला जरीपटकाच्या एका खासगी रुग्णालयात आणि तेथून मानकापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु वेदची जखम अधिक असल्यामुळे वेदला धंतोलीतील एका खासगी रुग्णालयात पाठविण्यात आले. येथे वेदच्या मानेची रक्तप्रवाह करणारी आणि श्वास घेण्याची नस कापल्यामुळे डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. परंतु त्यानंतरही वेदची प्रकृती बिघडली आणि मृत्यूशी झुंज सुरू असताना रविवारी सकाळी उपचारादरम्यान वेदने या जगाचा निरोप घेतला. वेदच्या मृत्यूमुळे त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सायंकाळी धंतोलीतील कुंभारटोलीत पतंग पकडण्याच्या नादात वंश धुर्वे नावाच्या बालकाचा रेल्वेने कटून मृत्यू झाला होता.
बंदीनंतरही ‘नायलॉन’ मांजाचा जीवघेणा उन्माद
मकरसंक्रांतीच्या नावाखाली रविवारी दिवसभर पतंगबाजीचा उन्माद दिसून आला. पतंग पकडण्याच्या नादात ८ वर्षांचा मुलगा घराच्या छतावरून खाली पडून गंभीर जखमी झाला. तर, दिवसभरात धारदार मांजाने कोणाचा गळा, कोणाचा चेहरा, कोणाची बोटे, कोणाचा पाय कापला गेल्याची ५०वर प्रकरणे पुढे आली. यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती.
आपल्या संस्कृतीचा आनंद साजरा करताना दुसऱ्याचा बळी घेणे किंवा जखमी करणे हे कुठेही सांगितलेले नाही. पण तरीही दिवसभर हे पतंगबाज रस्त्यांवर, घराच्या छतांवर अक्षरश: धुमाकूळ घालीत होते. पतंगबाजांचा हा उन्माद आणि मस्ती उतरविण्यासाठी कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे विविध घटनांतून पुन्हा एकदा सामोर आले आहे.
- ८ वर्षाच्या बालकावर ‘ट्रॉमा’मध्ये उपचार
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) वैद्यकीय अधीक्षक डॉ. भरत कुचेवार यांनी सांगितले, रविवारी पतंग पकडण्याचा नादात एक ८ वर्षांचा मुलगा घराच्या छतावरून खाली पडला. त्याच्यावर मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. यासह दिवसभरात मांजामुळे सहाजण जखमी अवस्थेत आले. यातील कोणाच्या हाताची बोटे, कोणाचा पाय तर एकाचा चेहरा कापला गेला होता. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सांगितले, दोन दिवसांत मांजामुळे सहा जण जखमी अवस्थेत मेयोमध्ये उपचारासाठी आले. यातील एका तरुणीची हुनवटी, एकाची करंगळी गंभीररीत्या कापल्या गेली.
- मांजामुळे अंगठ्याची नस कापली, एकाच्या डोळ्याखाली गंभीर जखम
पतंग पकडण्याचा नादात झालेला अपघात व मांजामुळे जखमी झालेल्या जवळपास ४०वर रुग्णांनी शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. यात आनंदनगर येथील ऑर्थाेपेडिक रुग्णालयात पतंगीच्या मांजामुळे ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाचा पाय हाडापर्यंत कापला गेला. दुसऱ्या एका ५५ वर्षाचा इसमाच्या डोळ्याखाली गंभीर जखम झाली. तर २२ वर्षीय युवकाच्या अंगठ्याची नस कापल्या गेली. या शिवाय, मानेवाडा, प्रतापनगर चौक, सदर, काटोल रोड, कोराडी रोड, कामठी रोड व उमरेड रोड मार्गावरील अनेक मोठ्या खासगी इस्पितळांत जखमींनी उपचार घेतल्याची माहिती आहे.
- मांजा तुटतच नव्हता
जखमी झालेल्या काहींनी ‘लोकमत’ला सांगितले, अचानक समोर आलेल्या मांजाला हात लावला आणि हाताची बोटे कापल्या गेली. हा मांजा तुटतच नव्हता. नायलॉन मांजावर बंदी असताना हा मांजा आला कुठून हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही जिल्हाधिकारी व पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या व वापरणाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. काहींवर कारवाईही झाली. परंतु रविवारी अनेक पतंगशौकीन नायलॉन मांजाचा सर्रास वापर करीत असल्याचे दिसून आले.