नागपूर : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात १.१० कोटींचा नवा घोटाळा उघडकीस आला आहे. घोटाळ्यात चार कर्मचाऱ्यांना निलंबित करून मोठ्या माशांना वाचविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विजय झलके यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
महापालिका पुरवठा करण्यात येणाऱ्या स्टेशनरी व प्रीटिंग साहित्य पुरवठ्यात ६७ लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. मात्र, हा घोटाळा काही कोटींचा आह. कोविड काळापासून संपूर्ण व्यवस्था मनपा प्रशासनाच्या ताब्यात असल्याने विविध विभागांत घोटाळा सुरू आहे. याबाबतची एकही फाइल मंजुरीसाठी स्थायी समितीकडे आली नव्हती. ठरावीक चार ते पाच कंत्राटदारांकडून साहित्याचा पुरवठा करण्यात आल्याची माहिती झलके यांनी दिली.
चार कर्मचारी निलंबित
६७ लाखांच्या स्टेशनरी घोटाळा प्रकरणात चार कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. यात वित्त व लेखा विभागातील लेखाधिकारी राजेश मेश्राम, ऑडिटर अफाक अहमद, एस. वाय. नागदिवे व मोहन पडवंशी आदींचा समावेश आहे. यासोबत मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी झलके यांनी केली.
कोविड हॉस्पिटलमध्ये घोटाळा
कोविड काळात राधास्वामी सत्संग ब्यास येथे ५ हजार बेडचे कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले. यासाठी बेड, उशी, बेडशिट्स, पायदान, मग व अन्य साहित्याची खरेदी बिले कंत्राटदाराला अदा झाली, यात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विजय झलके यांनी केला.
कोविड साहित्यात भ्रष्टाचार
कोविड सेंटरमध्ये नाश्ता, जेवणामध्येही भ्रष्टाचार झाला आहे. तसेच पीपीई किट, सॅनिटायझर, मास्क, औषधे व अन्य साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाला आहे. याबाबतचे ६ कोटींचे बिल स्थायी समितीकडे मंजुरीसाठी आलेले नव्हते. अनेक ठिकाणी बॅरिकेटिंग नसतानाही त्याचे बिल जोडण्यात आले
अधिकारी वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी
महापालिका कार्यालयात अनेक अधिकारी, कर्मचारी २०-२० वर्षांपासून एकाच विभागात ठाण मांडून असल्याने भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे. कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी झलके यांनी केली.