नागपूर : कोरोनामुळे कन्फर्म आणि आरएसी (रिझर्व्हेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा आहे. परंतु रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एका प्रवाशाला जीव गमावण्याची वेळ आली. एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसमध्ये जीव गुदमरल्यामुळे एका प्रवाशाचा नागपूर रेल्वेस्थानकावर जीव गेला. ही घटना सकाळी ७ वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर घडली.
बखोरी शिवान पासवान (७०, रा. गाव सुमेरा, पोस्ट मद्दमपूर, जि. जहानाबाद, बिहार) असे मृत झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ते रेल्वेगाडी क्रमांक ०६३५९ एर्नाकुलम-पटना एक्स्प्रेसने प्रवास करीत होते. दीड महिन्यांपासून त्यांची प्रकृती खराब होती. त्यांच्यासोबत मुलगा सत्येंद्र (३२) हा प्रवास करीत होता. ते एस ८ कोचमध्ये ४० क्रमांकाच्या बर्थवर होते. कोचमध्ये जवळपास ११० प्रवासी असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर सकाळी ७ वाजता आली. बखोरी यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांच्या मुलाने नागपूर रेल्वेस्थानकावरून गाडी सुटताच गाडीची चेन ओढून गाडी थांबविली. त्याने वडिलांना खाली उतरविले. परंतु प्लॅटफार्मवर उतरविताच त्यांचा जीव गेला. त्यानंतर रेल्वेचे डॉक्टर प्लॅटफार्मवर पोहोचले. त्यांनी संबंधित प्रवाशास तपासून मृत घोषित केले. त्यानंतर लोहमार्ग पोलीस रवींद्र फुसाटे यांनी संबंधित प्रवाशाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात नेला. संबंधित प्रवाशाला कोरोना होता काय याचा अहवाल शवविच्छेदनानंतर येणार आहे.
................
एका कोचमध्ये एवढे प्रवासी कसे?
कोरोनामुळे सध्या कन्फर्म किंवा आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा देण्यात येत आहे. परंतु एर्नाकुलम-पटना या गाडीत एस ८ कोचमध्ये ७२ प्रवाशांना प्रवासाची मुभा असताना ११० प्रवासी कोचमध्ये कसे होते हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागपूर विभागातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी ही गाडी इतर विभागातील असल्यामुळे त्यांनी एवढे प्रवासी कसे बसविले याचे उत्तर देण्याचे टाळले.
.........
केवळ कन्फर्म, आरएसी तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा
नागपूर विभागातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यात केवळ कन्फर्म आणि आरएसी असलेल्या प्रवाशांना प्रवासाची मुभा देण्यात येते. रितसर त्यांचे तापमान मोजून रेल्वेस्थानकाच्या आत सोडण्यात येते.
-एस. जी. राव. सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग
.............