ग्रामपंचायतींना दिले उपाययोजनांचे निर्देश
नागपूर : जिल्ह्यातील ११० ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ९६७ पाण्याचे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासले होते. पावसाळ्याच्या तोंडावर आढळलेले दूषित पाण्याचे नमुने म्हणजेच आजाराला निमंत्रण देणारे ठरू शकतात. यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने सर्व ग्रामपंचायतींना उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.
आरोग्य विभागाकडून दर महिन्याला जिल्ह्यातील पाण्याच्या गुणवत्तेचे नमुने घेतले जातात. हे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतून तपासले जातात. पावसाळ्याच्या तोंडावर प्रयोगशाळेच्या अहवालाला महत्त्व असते. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढू नयेत म्हणून विभागाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जातात. जून महिन्याच्या अहवालात जिल्ह्यातील ११० पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत.
- ७ ग्रामपंचायतींना ‘यलो’ कार्ड
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे १ ते ३० एप्रिलदरम्यान पाणी गुणवत्ता स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १४ ग्रामपंचायतींना यलो कार्ड देण्यात आले होते. त्या ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या स्रोतात त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाने दिले होते. अजूनही ७ ग्रामपंचायतीला ‘यलो कार्ड’ कायम आहे.
- अनुजैविक तपासणीत २५० पाणी नमुण्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन
पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत अनुजैविक तपासणी अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ३६०० पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. यात २५० पाणी नमुन्यांत बॅक्टेरियल इन्फेक्शन आढळले आहे.
- तालुकानिहाय दूषित पाणी नमुने
तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने
नागपूर १३३ ३१
मौदा ९४ ६
कुही ७० १
सावनेर ९४ २१
भिवापूर २९ ०
कळमेश्वर ४३ ६
पारशिवनी ९१ ११
उमरेड ५१ २
कामठी १०९ ४
रामटेक ७५ १३
नरखेड ४३ ४
हिंगणा ६२ ४
काटोल २२ ०
देवलापार ५१ ७
- जे स्रोत दूषित असते, त्यांचे क्लोरिनेशन करून निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात येतात. त्या उपाययोजना केल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येते. वर्षात चार वेळा पाणी गुणवत्ता तपासणी होते. त्याचबरोबर पाण्यातील रासायनिक व अनुजैविक तपासणीसुद्धा केली जाते. या सर्व तपासण्या केवळ ग्रामस्थांना शुद्ध आणि शाश्वत पाणी मिळावे हीच अपेक्षा असते.
अनिल किटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग
- आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या
आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी वारंवार करण्यात येते. असे असले तरी, पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.
रश्मी बर्वे, अध्यक्ष व आरोग्य सभापती जि.प.