लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे ११०० कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील ३०० ते ४०० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
अयोध्येचा विकास विश्वाची सांस्कृतिक राजधानी अशा तऱ्हेने केला जाणार असून, मंदिर निर्माणासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार असल्याचे महाराजांनी सांगितले. कोरोना संक्रमणामुळे बाधित झालेले काम आता सुरू झाले असून, साडेतीन वर्षात पूर्ण होईल. बांधकामात राजस्थानातील दगडांचा समावेश होणार असून, आंदोलनादरम्यान जमा झालेल्या विटांचा उपयोग भूभाग सपाट करण्यासाठी होणार आहे. मंदिराच्या बाहेर १०८ एकरांचा भाग विकसित केला जाणार असून, तेथे डिजिटल लायब्ररी, प्राथमिक आरोग्य केंद्र, संग्रहालय, मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मारक आदींची उभारणी केली जाईल. प्रभू रामचंद्रांना वैश्विक विनयाचे प्रतीक म्हणून उभारले जाणार आहे. त्यासाठी शेजारील देशांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना श्रीरामाच्या आदर्शाचा पाठ पढविला जाईल, असे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.
पायव्यावर निर्णय आज, परदेशातून पैसा नको
मंदिर उभारणीसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तेथे खोदकाम करून दगडांचा पायवा तयार केला जाणार आहे. अनेक नामांकित आयआयटी विशेषज्ञांच्या चमूने यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. त्यावर मंगळवारी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच बांधकामासाठी परदेशातून निधी घेतला जाणार नाही. अनेक उद्योगपतींनी मंदिर बांधकामाचा खर्च वहन करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, हे काम सर्वसामान्यांच्या सहयोगातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे गोविंददेव गिरी म्हणाले. पत्रपरिषदेला गोविंद शेंडे, समितीचे उपाध्यक्ष राजेश लोया, रवींद्र बोकारे, प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार उपस्थित होते.
आंदोलनात ‘तुकडे गँग’
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत. शेतकऱ्यांच्या नावाने तेथे तुकडे गँग उतरली आहे. हे आंदोलन पाकिस्तान व खलिस्तान समर्थकांचे असून, देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आंदोलन उभे झाल्याचा आरोप गोविंददेव गिरी यांनी यावेळी केला. अयोध्येत प्रस्तावित मशिदीकरिता निधीची मागणी झाल्यास, त्यात सहयोग करण्यास तयार आहोत. देशातील बहुतांश मुस्लिम राष्ट्रवादी आहेत. मात्र, काही नेते हिंदू-मुस्लिम ऐक्यात फूट पाडण्याचे कारस्थान रचत असल्याचेही ते म्हणाले.
११ कोटी लोकांकडून निधी समर्पण
राममंदिराच्या निर्माणासाठी निधी समर्पण अभियानातून ४ लाख गावांतील ११ कोटी लोकांशी संपर्क साधला जाईल. यासाठी देवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेत विदर्भ प्रांत समितीची स्थापना झाली आहे. दहा, शंभर व एक हजार रुपयांचे कूपण नागरिकांकडून त्यांच्या इच्छेनुसार स्वीकारले जाणार आहे. राममंदिर आंदोलनातून संग्रहित झालेले सहा कोटी रुपये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या खात्यात वळते केले जाणार असल्याचे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.