नागपूर : दोन व्यापाऱ्यांचे अपहरण करत पैशांसाठी त्यांची गोळी मारून हत्या करणाऱ्या प्रकरणाचा सूत्रधार ओंकार महेंद्र तलमले याने विदर्भातील १११ बेरोजगारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याची बाब समोर आली आहे. ‘नासा’मध्ये वैज्ञानक असल्याची थाप मारत त्याने बेरोजगारांना ‘टार्गेट’ केले व ‘रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर’मध्ये नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून ५.३१ लाख रुपये उकळले. त्याच्याविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निरालाकुमार सिंह व अंबरीश गोळे या दोन व्यापाऱ्यांची मागील आठवड्यात कोंढाळी येथील फार्महाऊसमध्ये ओंकार व त्याच्या सहकाऱ्यांनी हत्या केली होती. त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ओंकारकडून फसवणूक झालेल्या अश्विन प्रवीण वानखेडे (३२, मनिषनगर) यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट देत त्याच्याविरोधात तक्रार दिली. ओंकारचे माटे चौकातील एका इमारतीत कार्यालय होते. कोरोनाच्या कालावधीत अश्विन वानखेडेशी त्याची भेट झाली. दोघेही ढोलताशा पथकात एकत्रित असल्याने एकमेकांना ओळखत होते. मी ‘नासा’मध्ये ज्युनिअर सायंटिस्ट पदावर कार्यरत असल्याची त्याने बतावणी केली.
नागपुरातील ‘रिजनल रिमोट सेंसिंग सेंटर’मध्ये कार्यालयीन कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असून लवकरच पदभरती होणार आहे. तेथील अधिकारी माझ्या परिचयातील असून मी तुला नोकरी लावून देऊ शकतो, असे त्याने सांगितले. त्याबदल्यात २ लाख रुपये द्यावे लागतील, असेदेखील त्याने म्हटले होते. कोरोनाची सुरुवात होती व सरकारी नोकरीची संधी असल्याने अश्विनने ओंकारवर विश्वास ठेवला. त्याने २ लाख रुपये त्याच्या खात्यात वळते केले. ओंकारने त्यानंतर इतर कुणी परिचयातील असतील तर त्यांनादेखील घेऊन ये असे म्हटले.
अश्विनने त्याचे काही नातेवाईक, मित्रांना तथाकथित पदभरतीची माहिती दिली. ही माहिती आणखी इतरांना मिळत गेली व १११ लोकांनी ओंकारला संपर्क केला. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या बॅंक खात्यात ५.३१ कोटी पाठविले. मात्र कुणालाही नोकरी लावून दिली नाही. तीन वर्ष हा प्रकार सुरू होता. अखेर हत्या प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यावर त्याचे बिंग फुटले. ओंकार अगोदरपासूनच अटकेत असून अश्विनच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस अपॉईंटमेन्ट लेटर पाठविले
ओंकारने ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना नंतर कुठलाच संपर्क केला नाही. मात्र सातत्याने लोकांकडून विचारणा होत असल्याने त्याने त्यांच्या पत्त्यावर व ई-मेल आयडीवर ऑफिस ॲडमिन, सिनिअर ॲडमिन पदावर नियुक्ती झाल्याचे बोगस अपॉईंटमेन्ट लेटर पाठविले. काही जण ‘रिमोट सेन्सिंग’च्या कार्यालयात गेल्यावर त्याचा खोटेपणा उघड झाला.
आर्थिक गुन्हेशाखेकडून तपास
या प्रकरणात बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेतर्फे तपास सुरू आहे. त्याच्या निवासस्थानासह संबंधित कार्यालयाचीदेखील झडती घेण्यात आली. ओंकारने आणखी कुणाची फसवणूक केली असल्यास त्यांनी समोर येण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त अर्चित चांडक यांनी केले आहे.