नागपूर : मध्यप्रदेशातून चोरट्या मार्गाने नागपूर जिल्ह्यात येऊ पाहणारे प्रतिबंधित कापूस बियाण्यांचे ११,१०० पॉकेट्स बुधवारी रात्री झालेल्या कारवाईत जप्त करण्यात आले. आयशर कंटेनरमधून हे बियाणे येत होते. खुरसापार टोल नाक्यावर तो अडवून ही कारवाई करण्यात आली.
मध्यप्रदेशातील अशोकनगर येथून हे प्रतिबंधित बियाणे घेऊन हा कंटेनर निघाला होता. कृषी विभागाला याची गोपनीय माहिती होती. त्यामुळे रात्री ९ वाजता खुरसापार टोलनाक्यावर कंटेनर पोहोचताच केळवद पोलिसांच्या मदतीने ही जप्तीची कारवाई करण्यात आली. तपासणी केली असता यात ११,१०० पॉकेट्स बोगस कापूस बियाणे असल्याचे आढळले. पोलीस स्टेशनला कंटेनर नेऊन कारवाई करण्यात आली. ती पहाटे ५ वाजेपर्यंत चालली. आयशर कंटेनर व बोगस बियाणे असा मिळून १ कोटी ५ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. केळवदचे पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राठोड, विभागीय गुण नियंत्रण अधिकारी केचे, सावनेरच्या तालुका कृषी अधिकारी अश्विनी कोरे, जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी चवणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी वानखेडे आदी या कारवाईदरम्यान उपस्थित होते.
...
खरिपातील पहिलीच मोठी कारवाई
यंदाच्या खरिपातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे. यापूर्वी तीन दिवसांपूर्वी बेला येथे एका कारवाईत प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आले होते. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने प्रतिबंधित बियाणे जप्त झाल्याने जिल्ह्यात किती मोठ्या प्रमाणावर हा व्यापार पसरला असावा, याची कल्पना येते. नागपुरातील तीन विक्रेत्यांकडे हा माल पोहोचवायचा होता, अशी माहिती ट्रक चालकाने दिली आहे.
...
कोट
अवैध बियाणे शेतकऱ्यांनी खरेदी करू नये. या प्रतिबंधित बियाण्याच्या खरेदीचे बिल मिळत नसल्याने भविष्यात अडचण निर्माण होते, शेतकऱ्यांची फसवणूक होते. कसलीही दाद मागता येत नाही. शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी केंद्रातूनच बियाणे घ्यावे. असा प्रकार आढळल्यास कळवावे.
- मिलिंद शेंडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी
...