सावनेर/कळमेश्वर/कामठी/काटोल/मौदा/कुही/रामटेक/कन्हान : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात गुरुवारी ११४५ रुग्णांची भर पडली. यात सावनेर तालुक्यात ४३५ तर पारशिवनी तालुक्यात १२२ रुग्णांची नोंद झाल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत वाढ झाली आहे. असे असले तरी ग्रामीण भागात आजही कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. खेडेगावातील टपरीवरील गर्दी आजही कायम आहे. यासोबतच कोविड लसीकरणाबाबत गैरसमज पसरविण्याचे काम काही मंडळी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही स्थिती कायम राहिल्यास ग्रामीण भागात कोरोनाची साखळी अधिक घट्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संक्रमणाची ही साखळी खंडित करण्यासाठी सरपंच आणि गावातील युवकांनी पुढे येण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
सावनेर तालुक्यात गुरुवारी १२९८ नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. तीत ४३५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सावनेर शहरातील १४२ तर ग्रामीण भागातील २९३ नागरिकांचा समावेश आहे. तालुक्यात चार रुग्णांचा मृत्यू झाला. यात पाटणसावंगी आणि चिचोली आरोग्य केंद्रांतर्गत गावातील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.
पारशिवनी तालुक्यात ५८८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १२२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात सावनेर शहरातील २२ रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात ५९ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न.प. क्षेत्रातील १४ जणांचा समावेश आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात गोंडखैरी येथे १५, परसोडी, तेलकामठी येथे प्रत्येकी ५, धापेवाडा (४), लिंगा (३), झुनकी, पानउबाळी, कळंबी, तिडंगी येथे प्रत्येकी दोन तर भडांगी, सावळी, तोंडाखैरी, तिष्टी बु., नांदीखेडा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कुही तालुक्यात ३५९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ६० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यात हरदोली राजा येथे १८, सोनपुरी (१०), मांढळ (८), कुही (५), वेलतूर, राजोला, नवरगाव येथे प्रत्येकी तीन, पोहरा, सिल्ली, आजनी येथे प्रत्येकी दोन तर तितूर, कऱ्हांडला, गोठणगाव, आकोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ५० रुग्णांची भर पडली. यात काटोल शहरातील २४ तर ग्रामीण भागातील २६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागामध्ये पारडसिंगा येथे पाच, कोहळा, मूर्ती येथे प्रत्येकी तीन, चारगाव, घरतवाडा, खानगाव येथे प्रत्येकी दोन तर, कुकडीपांजरा, वंडली, कलंबा, धीवरवाडी, खंडाळा, इसापूर (खुर्द), सोनोली, मसली, आजनगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात २६ रुग्णांची भर पडली. यात दोन रुग्ण शहरातील तर २४ ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात पटगोवरी येथे आठ, मनसर माईन, भोजापूर, देवलापार, हेटीटोला, नगरधन येथे प्रत्येकी दोन तर हिवरा बाजार, खैरी बिजेवाडा व मानापूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
हिंगण्यात ग्राफ वाढतोय मात्र बाजारातील गर्दी कायम
हिंगणा तालुक्यात गुरुवारी ६०३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तालुक्यात बाधितांच्या संख्येत रोज वाढ होत असताना बाजारातील गर्दीवर अद्याप नियंत्रण आले नाही. त्यामुळे संक्रमणाचा वेग अधिक आहे. तालुक्यात वानाडोंगरी न.प. क्षेत्रात २६, डिगडोह (२१), हिंगणा (११), रायपूर, इसासनी, कोतेवाडा येथे प्रत्येकी तीन तर निलडोह, टाकळघाट, मांडवघोराड, किन्ही धानोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.