लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. त्यासोबतच कोरोनाशी लढण्यासाठी उपयोग येणाऱ्या लसी, ऑक्सिजन व रेमडेसिविरचा पुरवठाही कमी होऊ लागला आहे. बुधवारी जिल्ह्याला एकूण ११,४८० लसीचे डोस मिळाले. तर रेमडेसिवीर इंजेक्शन केवळ ४४१ प्राप्त झाले.
जिल्हा प्रशासनानुसार १९ मे रोजी ११४८० लसीचे डोस उपलब्ध झाले. यापैकी ८४०० कोविशिल्ड व ३०८० कोवॅक्सिन आहेत. मनपाला ५ हजार कोविशिल्ड व २ हजार कोवॅक्सिनचे डोस देण्यात येतील. त्याचप्रकारे ग्रामीण भागासाठी ३४०० कोविशिल्ड व १०८० कोवॅक्सिन वितरित केले जातील. हे लस ४५ वर्षावरील नागरिकांना देण्यात येतील. यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. कमी पुरवठ्यामुळे लसीकरणाला गती मिळू शकलेली नाही. दुसरीकडे ऑक्सिजन पुरवठाही नोंदवण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून साततत्याने १०० मेट्रिक टनापेक्षा अधिक ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. परंतु बुधवारी केवळ ८२ मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाले. यापैकी ६२ मेट्रिक टन रुग्णालय व प्लांटला वितरित करण्यात आले. उर्वरित ऑक्सिजन इतर जिल्ह्यांना पाठवण्यात आले. तसेच बुधवारी नागपुरासाठी केवळ ४४१ रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले. यासोबतच टॉसिलीझूमब इंजेक्शनही कमी मिळाले. बुधवारी केवळ ११० इंजेक्शन प्राप्त झाले.