नागपूर : शहरात आगीची घटना घडल्यास अग्निशमन विभागाची पाण्यासाठी धावपळ होऊ नये, वेळीच आग आटोक्यात आणता यावी, यासाठी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ११६ हायड्रंट लावण्यात येणार आहेत. यावर ९९ लाख ९८ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
अग्निशमन विभागाने २०१७ साली याबाबतचा प्रस्ताव दिला होता. स्थायी समिती व सभागृहाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. अग्निशमन विभागाने १ कोटीची तरतूदही केली होती. मात्र, मागील पाच वर्षांपासून हायड्रंट लावण्याचे काम रखडले आहे. आता सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभाग याबाबतच्या निविदा काढणार आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
१९४७ च्या सुमारास शहरात १ हजार हायड्रंट होते. कुठे आग लागल्यास रस्त्याच्या शेजारी असलेल्या या हायड्रंटमधून अग्निशमनच्या बंबांना २४ तास पाणीपुरवठा करण्याची सोय होती. आग आटोक्यात आणण्यासाठी याची मदत होत होती. मात्र, मागील काही वर्षांत शहराचा विकास करताना रस्ते रुंद झाले. या रस्त्यांच्या कामात हायड्रंट हरवले. त्यात नवीन पाइपलाइन टाकताना हायड्रंटला जमीनदोस्त करण्यात आले. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. वास्तविक मागील काही वर्षांत शहराची लोकसंख्या वाढली आहे. यासोबतच झपाट्याने विस्तार झाला आहे. टोलेजंग इमारती उभ्या झाल्या. त्यानुसार अग्निशमन विभागाची यंत्रणा सक्षम झाली नाही. विभागाने वेळोवळी साधनसामग्री व मनुष्यबळाची मागणी केली. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
शहरात केवळ नऊ हायड्रंट
आज शहरात केवळ ९ हायड्रंट उरले आहेत. यात कस्तुरचंद पार्कजवळील सेंट जोसेफ शाळा, रेल्वेस्टेशनलगत, विधान भवनाजवळ, महापालिकेच्या सदर हॉस्पिटलच्या बाहेर, रवीभवन परिसर, टिळक नगर, इंदिरा गांधी रुग्णालय आणि काचीपुरा चौक (रामदासपेठ) आदी ठिकाणी हायड्रंट आहेत.
सर्वेक्षणानंतर ११६ जागा निश्चित
अग्निशमन व जलप्रदाय विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून हायड्रंटसाठी ११६ ठिकाणे निश्चित केली. यासाठी वेळोवेळी निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही.