नागपूर : नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आर्थिक वर्ष २०२३-२४ विशेष राहिले. वर्ष २०२२-२३ च्या तुलनेत प्रवासी संख्येत ११.८ टक्के अर्थात २.२८ लाखांनी वाढ झाली. वर्ष २०२३-२४ मध्ये २२ हजार उड्डाणांच्या माध्यमातून २७.९४ लाख लोकांनी हवाई प्रवास केला. यामध्ये १.११ लाख विदेशी आणि २६.८३ लाख घरगुती प्रवासी होते. नागपूरसाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. या तुलनेत वर्ष २०२२-२३ मध्ये प्रवासी संख्या २५.६५ लाख होती.
सामान्यांमध्येही हवाई प्रवासाची क्रेझनागपुरात उद्योग-व्यवसाय, पर्यटन आणि राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. शिवाय सामान्यांचा हवाई प्रवासाकडे ओढा वाढला आहे. नागपुरातून देशाच्या अन्य शहरांमध्ये थेट सेवा सुरू झाल्यास प्रवाशी संख्येत आणखी वाढ होऊ शकते. सध्या नागपुरातून दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, इंदुर, अहमदाबाद, लखनऊ, गोवा, चेन्नई, नाशिक, बेळगाव, अजमेर या घरगुती उड्डाणांसोबतच शारजाह आणि दोहा ही आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. सर्वाधिक उड्डाणे दिल्ली, मुंबई, पुणे आणि बेंगळुरूकडे आहेत.
उड्डाणांमध्ये १० टक्के वाढआर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २०,४४० उड्डाणे, तर वर्ष २०२३-२४ मध्ये जवळपास २२ हजार विमानांनी उड्डाण केले. सर्वाधिक उड्डाणांची संख्या डिसेंबरमध्ये २,०२३ राहिली. आर्थिक वर्ष १ एप्रिल-२३ ते ३१ मार्च-२४ ची आकडेवारी पाहिल्यास एप्रिल-२३ मध्ये १,५८८ उड्डाणांच्या माध्यमातून २,६९,६५५ लोकांनी प्रवास केला. मे-२३ महिन्यात १,९२८ उड्डाणे २,४९,१२१ प्रवासी, जूनमध्ये १,७०५ उड्डाणे २,४३,३४६ प्रवासी, जुलै १,७९९ उड्डाणे २,३०,११९ प्रवासी, ऑगस्ट १,७४७ उड्डाणे २,३०,५९५ प्रवासी, सप्टेंबर १,७४६ उड्डाणे २,२१,९३२, ऑक्टोबर १,८९२ उड्डाणे २,२१,२५९ प्रवासी, नोव्हेंबर १,८९८ उड्डाणे २,१८,१९२ प्रवासी, डिसेंबर २,०२३ उड्डाणे २,४०,८५१ प्रवासी, जानेवारी १,८८६ उड्डाणे २,२७,१२२ प्रवासी, फेब्रुवारीमध्ये १,८७३ उड्डाणे २,१२,१६१ प्रवासी आणि मार्च महिन्यात १,८८० उड्डाणांतून २,२९,७२१ लोकांनी प्रवास केला.
६२ हून अधिक विमानांचे उड्डाणअन्य शहरांच्या तुलनेत नागपुरातून हवाई प्रवासी संख्येत वाढ होत असून उन्हाळ्यात वाढीची नोंद आहे. सध्या ६२ हून अधिक विमानांचे उड्डाण होत आहे. सध्या नागपुरातून दररोज ७,५०० ते ८ हजार लोक प्रवास करतात.