नागपूर : पार्ट टाईम जॉबच्या नादात एका तरुणाने स्वत:च्या बॅंक खात्यातील ११.९६ लाख रुपये गमावले. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
बतुल सैफुद्दीन अली (२५, चमन अपार्टमेंट, इतवारी) असे संबंधित तरुणाचे नाव आहे. अलीला ७ ऑगस्ट रोजी ९९०५७९३६७१ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्याने अलीला पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली. अलीने त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असता आरोपीने टास्क पूर्ण केल्यास नफा मिळेल असे सांगितले. काही टास्कसाठी आरोपीने अलीला पैसेदेखील दिले. त्यामुळे अलीचा विश्वास बसला. मात्र त्यानंतर जास्त फायदा हवा असेल तर गुंतवणूक करावी लागेल, असे आरोपीने सांगितले. चांगल्या परताव्याच्या आशेत अलीने वेळोवेळी ११.९६ लाख रुपये गुंतविले. मात्र आरोपीने कुठलाही परतावा दिला नाही. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अलीने तहसील पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.