छाननीत १४ अर्ज बाद : अंतिम लढतीचे चित्र ४ जानेवारीला स्पष्ट होणार
नागपूर : जिल्ह्यात १३० ग्रा.पं.च्या १,१९८ जागांसाठी ३,१२८ उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरविण्यात आले आहे. बुधवारी १३ ही तालुक्यात ३,१४२ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. या अर्जांची गुरुवारी तालुकास्तरावर छाननी करण्यात आली. तीत एकूण १४ उमेदवारांचे अर्ज विविध कारणास्तव बाद ठरविण्यात आले. दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाचे सर्व्हर डाऊन झाल्याने बुधवारी शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात आली होती.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ४ जानेवारी रोजीच दुपारी ३ वाजेनंतर अंतिमरीत्या निवडणूक लढणाऱ्या उमेदवारास निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून चिन्ह वाटप करण्यात येईल.
५०५ केंद्रांवर होणार मतदान
जिल्ह्यातील १३० ग्रा.पं.साठी ५०५ मतदान केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेतले जाईल. १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजतापासून तालुकास्तरावर मतमोजणीला सुरुवात होईल. याच दिवशी जिल्ह्यात ग्रा.पं.चे कारभारी ठरतील. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना २१ जानेवारी रोजी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येईल.
राजकीय मोर्चेबांधणी
उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आता गावागावात राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. गावात राजकीय गटाचे पॅनेल निश्चित झाल्यानंतर ज्यांना निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली नाही अशांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले. आता स्थानिक आणि जिल्हास्तरावरील नेत्यांकडून त्यांच्या मनधरणीला वेग आला आहे. सध्या जिल्ह्यात बहुतांश ग्रा.पं.मध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार असल्याचे चित्र आहे.